छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोपावरुन हर हर महादेव या मराठी चित्रपटाला राज्यभरातून विरोध होत आहे. संभाजी ब्रिगेडच्यावतीने सकाळी पुण्यात हर हर महादेव चित्रपटाचे शो पाडण्यात आले आहे. त्यानंतर रात्री उशिरा ठाण्यामध्येही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनीही थेट चित्रपटगृहात घुसून चित्रपटगृह रिकामे करत हर हर महादेवचा शो बंद पाडला.
यावेळी आव्हाड आक्रमक झाले असून त्यांनी आपल्या कार्याकर्त्यांसह मल्टिप्लेक्समध्ये शिरत घोषणाबाजी करत शो बंद पाडला. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विनंती करून प्रेक्षकांनी चित्रपटागृहाबाहेर जाण्याची विनंती करीत होते. त्यावेळी काही प्रेक्षकांनी चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाकडे तिकिटाचे पैसे परत मागितले. त्यावेळी प्रेक्षक आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाल्याने त्या प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. अभिजीत देशपांडे म्हणाले की, “आम्ही कोणताही चुकीचा इतिहास चित्रपटात दाखवलेला नाही. हर हर महादेव चित्रपटाला सेन्सॉर बोर्डकडून प्रमाणपत्र मिळालं आहे. या चित्रपटात दाखवलेल्या सगळ्या ऐतिहासिक संदर्भाचे पुरावे आम्ही सेन्सॉर बोर्डला पुरविले गेले आहेत. कोणत्याही चित्रपटाला अशीच मान्यता मिळत नाही. ऐतिहासिक चित्रपटासंदर्भात सेन्सॉर बोर्डच्या पॅनेलवर इतिहसकारही असतात. त्यामुळे चित्रपट न पाहता त्यावर टीका करणे चुकीचे आहे”.अशा शब्दात त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.