विनायक दळवी, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार
कोण हा प्रवीण तांबे ? प्रवीण (Pravin Tambe) तुमच्या आमच्यासारखा सामान्य कुटुंबातून आलेला. घर- गृहस्थीच्या रहाटगाड्यात अडकलेला. लग्न झालं. दोन मुलं झाली. ओरिएंट शिपिंगमध्ये अकाउंट विभागात काम करायला लागला. त्याच्या जीवनावर चित्रपट तयार करण्याइतपत यात काय आहे ? हा प्रश्न पडणेही साहजिक आहे. सर्वसामान्यांच्या जगण्या पलीकडेही एक सत्य तो जगला…जगतो…
मुलुंडला तो राहायचा. अस्सल मुंबईकरांप्रमाणे तो गल्ली क्रिकेट खेळायचा. गल्लीतून मैदानी क्रिकेटमध्ये आला. त्यानंतरच ध्येय अर्थातच मुंबईसाठी रणजी खेळणे, भारतासाठी खेळणे. त्याच्या आयुष्यात यापैकी काहीच घडलं नाही.दरम्यानच्या काळात त्याच लग्न झालं. मुलं झाली. त्याचे शिक्षण झाले. सोबतच प्रवीणच (Pravin Tambe) क्रिकेट प्रेमही कायम होतं. त्याने जिद्द सोडली नव्हती. विशीतून चाळीशीत पोह्चल्यानंतरही तो स्वप्न पाहत होता. त्यासाठी अहोरात्र मेहनत करायचा. नोकरी आणि क्रिकेट मैदान असा अविरत प्रवास सुरु होता. ओरिएण्टल शिपिंगमध्ये कार्यालयाचे काम आणि क्रिकेट अशी तारेवरची कसरत सुरु होती. ओरिएण्टल शिपिंग त्यावेळी 'एच' डीव्हीजनमध्ये होती.प्रवीणने तो संघ 'ए' डीव्हीजनपर्यंत पोहचवला. प्रवीणने (Pravin Tambe) कंपनीच्या संघाला शिखरावर पोहचविले ,पण त्यानंतर कंपनी बंद पडली. क्रिकेट संघ बंद झाला. अशा गोष्टीना तो डगमगणारा नव्हता. त्याला डि. वाय. पाटील क्रिकेट अकॅडमीने नोकरी दिली. स्पोर्ट्स ऑफिसर झाला. तेथेही नोकरी सांभाळतच क्रिकेटचे प्रेम जपत राहीला. कोणत्याहि अपेक्षांशिवाय प्रवीण म्हणत होता ," गीते मधील शिकवणीप्रमाणे कर्म करीत राहायचे,फळांची अपेक्षा न करता,"प्रवीणही अपेक्षा न करता, ध्येयपूर्तीच्या अपेक्षा भंगाचे दुःख न बाळगता खेळत राहीला… खेळत राहील…
अखेर वयाच्या ४१ व्या वर्षी त्याच्या २५ -३० वर्षांच्या मेहनतीला फळे लागवयाची चिन्हे दिसायला लागली,राजस्थान रॉयल्साठी गुणवत्ता हुडकताना राहुल द्रविडच्या नजरेला तो पडला. द्रविडने त्याचे मैदानी क्रिकेटमधील काही सामने पाहिले व आयपीएलच्या सर्व नेट्समध्ये त्याला बोलवलं. प्रवीणचे स्वागत खेळाडूंच्या "ये अंकल कौन है"! या वाक्याने झाली. पण त्यानंतर त्याला 'अंकल ' म्हणायचे धाडस कुणीही केले नाही, कारण नेट्समध्ये सरावादरम्यानही प्रथितयश खेळाडूंनाही त्याच्या लेगस्पिन गोलंदाजीवर एकही षटकार मारता आला नाही .
प्रवीणच्या नावावर रणजी सामना नव्हता, कोणतीही नेत्रदीपक कामगिरी नव्हती, त्यामुळे पाहिल्यावर्षी त्याला प्रत्यक्ष सामन्यात खेळण्याची संधी मिळत नव्हती.हि हळहळ प्रवीणने गेल्या २५ वर्षात पचविली होती. तो निराश झाला नाही. उलट उत्साहाने सरावात सहभागी झाला. नेट्सला सर्वप्रथम यायचा. प्रथम चेंडू त्याच्याच हातात असायचा आणि सर्वात शेवटी देखील चेंडू त्याच्याच हातात असायचा. राजस्थान रॉयल्सचा कप्तान राहुल द्रविड देखील या गोष्टीमुळे अवाक झाला होता. त्यालाही आश्चर्य वाटायचं, याला संघात आपण खेळवत नाही तरीही सरावात जराही कसर करत नाही. वेळे आधी येतो आणि सर्वात शेवटी जातो.
अखेर प्रवीणची तपश्चर्या फळाला आली. राहुल शर्मा जायबंदी झाला आणि प्रवीणला प्रत्यक्ष मैदानात उतरण्याची संधी मिळाली. तो लेग स्पिनर गोलंदाजी करायचा. खरं तर तो फिरकी गोलंदाज कसा झाला हा किस्साही मजेशीर आहे. ओरिएंटल शिपिंगच्या एका कप्तानाने एका संथ खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज निष्प्रभ ठरत आहेत हे पाहून प्रवीणला वेगवान गोलंदाजी नको तर फिरकी टाक असा आदेश दिला. त्या सामन्यात पाटा विकेटवर प्रवीणने ३ बळी घेतले आणि कायमसाठी लेग स्पिनर बनला. लेग स्पिनर्ससाठी आवश्यक असलेला संयम त्याच्याकडे होताच. तासंतास सरावामुळे चेंडूच्या टप्प्यावर मिळवलेली हुकूमत होती. लेगस्पिनर्सच्या भात्यातली लेग स्पिन,फ्लिपर पासुन गुगलीपर्यंतची सारी प्रभावी अस्त्रे त्याच्याकडे होती. वयापुढचा ४१ हा अंक वगळता त्याच्यापुढे कसलेही आव्हान नव्हते.
आयपीएल (IPL) नंतरच्या म्हणजे २०१४ च्या कोलकाता नाईट रायडर्स (kolkatta Knight Riders) विरुद्ध सामन्यात त्याने चमत्कार घडविला, हॅटट्रिकसह त्याने राजस्थान रॉयल्सला (Rajsthan Royal) अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला. २०१३ ला अश्विन व सुनील नरियन यांना मागे सारून त्याने १२ बळींसह ' गोल्डन बॉलर ' पुरस्कार पटकाविला. मुंबई रणजी पदार्पण आणि कॅरिबियन क्रिकेट लीगमध्ये ख्रिस गेल, इऑन मॉर्गन,कायरॉन पोलार्ड यांना बाद करून हॅट्ट्रिक घेतलीच पण १२ चेंडू फॅबियन आलयीन व उपुल थरंगा. यांच्यासह एकूण ५ बळी घेत नवा विश्व् विक्रम केला.त्याच्या यशाची कमान वाढत्या वयाबरोबर अशीच चढत राहिली. यंदा तर कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्यावर फिरकी गोलंदाजीच्या प्रशिक्षणाचीही जबाबदारी टाकली आहे.
यशाच्या शिखरावर असलेला हा एक अतिशय सामान्य माणूस त्याच्या जीवनावर चित्रपट काढावा असे सुदीप तिवारी यांना वाटले. क्रिकेट पंच अरविंद महाडेश्वर यांची मुलगी ऋचा हि तिवारी यांच्या कार्यालयात आहे. तीने चित्रपटाच्या ऑफरची विनंती प्रवीण पर्यंत पोहचवली. श्रेयस तळपदे भूमिका साकारतोय. श्रेयसने याआधीही एका वेगवान क्रिकेट गोलंदाजाच्या जीवनावर आधारीत चित्रपटात भूमिका साकारली आहे. श्रेयस त्यावेळी स्वतः मैदानी क्रिकेट खेळायचा. दोन दशकानंतर आज श्रेयस पुन्हा एकदा क्रिकेटपटूची भूमिका साकारतोय. प्रवीण तांबे या क्रिकेटपटूच्या मैदानावरील कर्तृत्वाप्रमाणे किंवा त्यापेक्षाही अधिक पटीने त्याला भुरळ घातली आहे. त्याच्या जिद्दीने क्रिकेटवरील प्रेमाने, आणि संधी मिळत नसतानाही सतत प्रयत्न करीत, राहण्याच्या त्याच्या चिकाटीने.
प्रवीण म्हणत होता, "नेहमीचे आयुष्य जगता जगता, क्रिकेटचे प्रेमही मी जपत राहिलो. मला काधीही अपेक्षाभंगाचे दुःख झाले नाही. संधी देणे हे इतरांच्या हातात असले तरीही, कठोर मेहनत करणे माझ्या हातात आहे. तेच मी तब्बल २५-३० वर्षे करीत राहिलो. संधी मिळाली की प्रामाणिक प्रयत्न करीत राहिलो. प्रथमदर्शनी साधी-सोपी वाटणारी ही गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकेल. असा विश्वास वाटल्यानेच निर्मात्यांनी प्रसिद्धीचे लेबल नसलेल्या एका सामान्य क्रिकेटपटूच्या जीवनावर जिद्दीच्या प्रवासावर चित्रपट काढण्याचे धाडस केले आहे.