छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका म्हणजे 'सीआयडी'. या मालिकेने लहान मुलांपासून ते वयस्कर प्रेक्षकांपर्यंत सर्वांना वेड लावलं होतं. मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारे एसीपी प्रद्युमन, इन्स्पेक्टर अभिजीत, दया, फ्रेड्री, डॉ. साळुंखे आणि डॉ. तारिका ही पात्रे खूप प्रसिद्ध होत्या. 21 जानेवारी 1998 मध्ये सुरू झालेल्या या मालिकेने मात्र 2018 वर्षी प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. मात्र आजही या मालिकेतील कलाकार प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना पाहायला मिळते.
अगदी सर्वसामान्य प्रेक्षकांपासून ते मोठमोठे कलाकार सर्वजण या मालिकेचे चाहते होते. यापैकीच दिवंगत गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यादेखील सीआयडी मालिकेच्या चाहत्या होत्या. नुकताच 'सीआयडी' मालिकेतील प्रसिद्ध पात्रांपैकी एक दया ऊर्फ दयानंद शेट्टीने हा किस्सा शेअर करत म्हणाला, 'त्यांना सीआयडी मालिका एवढी आवडायची की एके दिवशी त्यांनी थेट अमेरिकेतील कार्यालयात फोन करून कार्यक्रम बंद झाल्याची तक्रार केली होती'.
लता मंगेशकर यांच्याविषयी बोलताना पुढे दयानंद म्हणाला, 'लताजी अत्यंत आवडीने त्यांच्या रूममध्ये बसून आमचा कार्यक्रम आवडीने पाहायच्या. त्यासोबतच, त्यांना फोटोग्राफीची आवड होती. लताजी एसीपी आणि इतर कलाकारांचे क्लोज अप फोटो काढायचे आणि ते प्रत्येकाला पाठवायचे. जेव्हा ही मालिका बंद झाली तेव्हा लतादीदी यांनी स्वत: अमेरिकेत असलेल्या सोनीच्या कार्यालयात फोन करून तक्रार केले होते'.
पुढे दयानंद म्हणाला, 'जेव्हा कार्यक्रम संपला तेव्हादेखील लतादीदी आणि त्यांचे कुटुंबीय हा कार्यक्रम का थांबला? असं सतत विचारायचे. त्यावेळी लातादीदींनी अमेरिकेतील सोनीच्या कार्यालयात फोन करून याबद्दलची तक्रारदेखील त्यांनी केली होती. लतादीदींनी, 'सीआयडी हा माझा अत्यंत आवडीचा कार्यक्रम आहे. अनेक लोक हा कार्यक्रम अत्यंत आवडीने पाहतात. तरी सुद्धा तुम्ही का ही मालिका बंद केलात?', असा सवालदेखील त्यांनी सोनीच्या कार्यालयात केला होता.