मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेदमध्ये मागील काही दिवसांपासून ट्विटर वॉर रंगले आहे. उर्फीच्या बोल्ड लूकविरोधात चित्रा वाघ यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर उर्फीविरोधात चित्रा वाघ यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे कारवाईची मागणी करणारे निवेदनही दिले होते. आता चित्रा वाघ याांनी उर्फी जावेदविरोधात पुन्हा एकदा ट्विट करत महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या की, भाषा नको तर कृती हवी.. सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं हि आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का? मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फीच्या या शरीरप्रदर्शनाचं जे अतिशय बिभत्स आहे. महिला आयोग याचे समर्थन करतंय का? भर रस्त्यात अर्धनग्न महिला खुलेआम फिरतीये. महिला आयोगानं स्वतः याची दखल घेत का नाही विचारला जाब.
विरोध उर्फी या व्यक्तीला नाही तर सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं या वृत्तीला आहे. आणि हो कायदा कायद्याचं काम करणारंच महिला आयोग काही करणार की नाही, असे सवाल त्यांनी महिला आयोगाला विचारले आहेत. सोबतच त्यांनी सामाजिक भान व स्वैराचाराला विरोध असे हॅशटॅग दिले आहेत.
दरम्यान, चित्रा वाघ यांनी ही बाई मला ज्यादिवशी सापडेल, त्या दिवशी थोबाड रंगवेन आणि नंतर तुम्हाला ट्विट करून सांगेन. काय व्हायचं, ते होऊद्या, अशा शब्दांत उर्फी जावेदवर घणाघात केला होता. यावर उर्फी जावेदने चित्रा वाघ यांना संजय राठोड प्रकरणाची आठवण करुन दिली होती. तर, या वादात आता तृप्ती देसाईंनी उडी घेत उर्फी जावेदचे समर्थन केले. उर्फी जावेदला हात लावला तर आम्ही पुढे येऊ, असं थेट आव्हानच तृप्ती देसाईंनी चित्रा वाघ यांना दिले होते.