बॉलिवूडमधील फोटोग्राफर कॉलस्टन ज्युलियनवर मॉडेलने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. अंधेरीत राहणाऱ्या २८ वर्षीय मॉडेलने ही तक्रारी केली आहे. मॉडेलने वांद्रे पोलिसांत या प्रकरणी तक्रार दिली. त्यानंतर वांद्रे पोलिसांनी फोटोग्राफर कॉलस्टन ज्युलियन याच्यासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फोटोग्राफर विरुद्ध बलात्कार केल्याप्रकरणी, तर इतरांविरुद्ध हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला गेला आहे.
मुंबई पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी आणि पोलीस उपायुक्त चैतन्य सिरीप्रोलू यांनी या घटनेबद्दलची माहिती दिली.
फोटोग्राफर कॉलस्ट ज्युलियनने वर्ष २०१४ आणि २०१८ मध्ये काम मिळवून देण्याची खोटी आश्वासनं देऊन वांद्रे परिसरात बलात्कार केल्याचं मॉडेलने तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी २६ मे रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
आरोप केलेल्या मॉडेलने यापूर्वी १२ एप्रिल रोजी सोशल मीडियावर पोस्ट लिहून तिच्यावर झालेल्या अत्याचारांची वाच्यता केली होती. कामाच्या वेळी कशापद्धतीने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला होता. त्याचबरोबर तिने एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही पत्र दिलं होतं. तिने फोटोग्राफरवर शारीरिक शोषण आणि हल्ला केल्याचा आरोप तिने पत्रातून केला होता.