नाशिक : भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेदमध्ये मागील काही दिवसांपासून वॉर रंगले आहे. वाघ यांनी उर्फीविरोधात थेट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यानंतर उर्फी जावेदने शिवीगाळ करत प्रत्युत्तर दिलं होते. यावरुन चित्रा वाघ चांगल्याच संतापल्या आहेत. ही बाई मला ज्यादिवशी सापडेल, त्या दिवशी थोबाड रंगवेन आणि नंतर तुम्हाला ट्विट करून सांगेन, अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी उर्फीला इशारा दिला आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या की, आम्ही काय काम करतो, हे ऊर्फी सारख्या बाईला मला सांगण्याची आवश्यकता वाटत नाही. ज्या पद्धतीने नंगानाच सुरू आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. संस्कृतीचे गोडवे गाणाऱ्या लोकांना हा नंगानाच दिसत नाही का?
मला तर ही उर्फट बाई कोण आहे, हे माहितही नाही. एका बाईने मला हे व्हिडिओ पाठवले, तिने मला सांगितलं, मुंबईच्या रस्त्यावर काय चाललंय बघा. हा नंगानाच आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही पोलिसांत तक्रार केली आहे. याला अंतिम स्वरूप दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही. जे ट्रोलर्स आमच्यावर टीका करत आहे, त्यांना हे मान्य आहे का, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
मग अशा या उघड्या-नागड्या फिरणाऱ्या मुली या महाराष्ट्रात चालणार नाही. ही बाई मला ज्यादिवशी सापडेल, त्या दिवशी थोबाड रंगवेन आणि नंतर तुम्हाला ट्विट करून सांगेन. काय व्हायचं, ते होऊद्या, अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर घणाघात केला आहे.
सध्या महाराष्ट्रातील तरूणांमध्ये गौतमी पाटीलच्या डान्सची तुफान चर्चा आहे. गौतमी पाटील डान्सशिवाय लावणी आणि अश्लीलतेच्या कारणावरून कायम वादात असते. याबाबत चित्रा वाघ यांना विचारले असता मी काय अजून तिचा डान्स बघितला नाहीये, असे त्यांनी म्हंटले आहे.