1987 मध्ये दूरदर्शनवर प्रसारित होणारी लोकप्रिय मालिका 'रामायण'मधील रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचं मंगळवारी रात्री निधन झालं. वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाला. अरविंद त्रिवेदी गेल्या बऱ्याच काळापासून प्रकृतीच्या समस्यांचा सामना करत होते. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.
अरविंद त्रिवेदी यांच्या पार्थिवावर आज (बुधवार) सकाळी मुंबईतील डहाणूकरवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ते दीर्घ काळापासून आजारी होते, पण काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाची दुःखद बातमी त्यांचे पुतणे कौस्तुभ त्रिवेदी यांनी दिली.
रामानंद सागर कृत 'रामायण' या लोकप्रिय मालिकेपासूनच अरविंद त्रिवेदी यांच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली. त्यांनी साकारलेली रावणाची भूमिका लोकांच्या मनात इतकी ठसली होती की, त्यांना खऱ्या आयुष्यातही त्यांच्या भूमिकेवरुन ओळखू लागले होते. 'रामायण'मध्ये काम करण्यापूर्वी गुजरातीत त्यांनी शेकडो नाटकं आणि चित्रपटांमधून अभिनय केला होता. अरविंद त्रिवेदी यांना कल्पना नव्हती की, रामायणातील त्यांची भूमिका इतकी लोकप्रिय होईल.