गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) सांगता झाली आहे. इफ्फीच्या समारोप समारंभात 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाचे वर्णन ‘व्हल्गर’ आणि ‘प्रोपगंडा म्हणून करण्यात आली. इस्त्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांच्या प्रचारात्मक वक्तव्यावर सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया एकामागून एक येऊ लागल्या. या वक्तव्यावर आता अभिनेते अनुपम खेर यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे.
गोव्यातील पणजी येथे सुरु असलेल्या कार्यक्रमात इस्त्रायलच्या चित्रपट दिग्दर्शकाने ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटावर जोरदार टीका केली. “काश्मीर फाईल्स चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही सर्वजण विचलित आणि त्रस्त आहोत. हा चित्रपट आम्हाला घाणेरडा तसंच प्रचार करणारा वाटला. इतक्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवणं योग्य नाही. मी माझ्या भावना या मंचावर मोकळेपणाने मांडू शकतो. ही चर्चा होणं गरजेचं आहे. मनात कोणतीही शंका न ठेवता ही चर्चा होणं कलेसाठी गरजेची आहे,” असं ते म्हणाले.
यावर अभिनेते अनुपम खेर म्हणाले की, “असत्याची उंची कितीही मोठी असली, तरी सत्याच्या तुलनेत ती छोटीच असते,” असं अनुपम खेर म्हणाले. ट्विट करुन त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. . इफ्फीचे ज्युरी हेड नदव लॅपिड यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटाची चर्चा रंगली असून, वाद निर्माण झाला आहे.