छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचा शूरवीर मावळा बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाची गाथा सांगाणार हर हर महादेव हा सिनेमा येत्या 25 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात महाराष्ट्राला चंद्रा म्हणून वेड लावणारी अभिनेत्री अमृता खानविलकर महत्त्वाच्या भूमिकेत आहे. सोनाबाई देशपांडेंची भूमिका अमृता साकारणार आहे. सिनेमातील अमृताचा पहिला लुक समोर आला आहे. तसेच अभिनेता शरद केळकर बाजीप्रभूंच्या प्रमुख भूमिकेत आहेत. तर अभिनेता सुबोध भावे पहिल्यांदा छत्रपती शिवादी महाराजांच्या भूमिकेत आहे.
शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांना आयुष्यभर साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी सोनाबाई देशपांडे यांचा मोलाचा वाटा आहे. याच सोनाबाईंची भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकर साकारणार आहे. सोनाबाईंच्या निमित्तानं अमृता पहिल्यांदा ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे. नाकात नथ, कपाळावर कुंकू, नऊवार साडीतील अमृताचा पहिला लुक समोर आलाय. अमृताला सिनेमात पाहण्यासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दाखवली आहे.
'हर हर महादेव' हा सिनेमा 5 भाषांमध्ये एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहे. मराठी तसेच हिंदी, तेलुगु, तमिळ आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. हर हर महादेव हा पहिला मराठी बहुभाषिक सिनेमा आहे. या सिनेमाच्या निमित्तानं एकाच वेळी अमृतासह मराठमोळे कलाकर इतर भाषिक लोकांपर्यंत पोहोचणार आहेत.