पुणे : मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. राहात्या घरातच त्यांचा मृत्यू झाला. तळेगाव आंबी एमआयडीसी येथील सोसायटीमध्ये महाजनी राहायचे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून ते येथील एका सदनिकेत भाडेतत्वावर राहत होते. याच घरामध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. मात्र दोन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शुक्रवारी रवींद्र महाजनी यांचा मुलगा अभिनेता गश्मिर तिथे आला होता. यानंतर त्यांचं निधन झालं असल्याची घटना उघड झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे यांनी दिली आहे. गश्मिर मुंबईत राहायला आहे. शविच्छेदनानंतर रवींद्र महाजनी यांचा मृतदेह ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अभिनेते रवींद्र महाजनी यांचा जन्म बेळगावमध्ये झाला. तर बालपण मुंबईत गेलं. त्यांना आधीपासूनच अभिनयाची आवड होती. लहानपणापासूनच ते नाटकात-चित्रपटात शाळेच्या स्नेहसंमेलनात काम करायचे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रवींद्र महाजनी यांनी चित्रपटसृष्टीत नशीब अजमावलं. रवींद्र महाजनींना ‘झुंज’ या चित्रपटात मुख्य भूमिकेची संधी मिळाली. 1974 साली आलेला हा चित्रपट खूप गाजला आणि रवींद्र महाजनी चांगलेच प्रसिद्ध झाले. यानंतर त्यांनी अनेक सिनेमांमध्ये भूमिका केल्या, ज्या चांगल्याच गाजल्याही.