Indian Actor And Singer Junior Mehmood: अभिनेते ज्युनियर मेहमूद यांनी वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. कर्करोगामुळे ते अनेक वर्ष त्रासलेले होते. ज्युनियर मेहमूद यांचं निधन त्यांच्या राहत्या घरी झालं आहे. 'हाथी मेरे साथी', 'कारवां' आणि 'मेरा नाम जोकर' यांसारख्या अनेक हीट सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेते ज्युनियर मेहमूद यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. चाहत्यांचं मनोरंजन करणारा अभिनेता मात्र चाहत्यांना रडवून पुढच्या प्रवासासाठी गेला आहे. ज्येष्ठ अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचं निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. दीर्घकाळ कर्करोगाशी झुंजत असलेल्या ज्युनियर मेहमूद यांनी गुरुवारी रात्री राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलगे असा परिवार आहे.
अभिनेता जॉनी लिवर जेव्हा त्यांच्या भेटीला गेला, त्याचवेळी ज्युनियर मेहमूद यांच्या आजारपणाची बातमी समोर आली होती. जॉनी लिवरनंतर मास्टर राजू आणि जितेंग्र यांनी देखील त्यांची भेट घेतली होती. ज्युनिअर मेहमूद यांच्यावर टाटा मेमोरियल रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी त्यांचे जुने मित्र, ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र आणि सचिन पिळगावकर यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर सचिन आणि अभिनेते जितेंद्र यांनी रुग्णालयात त्यांची भेट घेतली होती.
बालकलाकार म्हणून ज्युनिअर मेहमूद यांनी अनेक चित्रपटांत काम केले. यावेळी सचिन पिळगावकर यांची आणि त्यांची जोडी फार लोकप्रिय झाली होती. त्यांनी ‘बचपन’, ‘गीत गाता चल’ आणि ‘ब्रह्मचारी’ यासारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. ज्युनिअर मेहमुद यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले. 1967 मध्ये संजीव कुमार यांचा नौनिहाल या चित्रपटातून त्यांनी करियरला सुरुवात केली. त्यावेळी ते फक्त 11 वर्षांचे होते. संघर्ष, ब्रह्मचारी, दो रास्ते, कटी पतंग, हाथी मेरे साथी, हंगामा, छोटी बहू, दादागिरीसह अनेक चित्रपटांत त्यांनी काम केले. त्यांनी बलराज साहिनीपासून सलमान खानपर्यंत अनेक स्टारसोबत काम केले. सर्वाधिक चित्रपट त्यांनी राजेश खन्ना सोबत केले. राजेश खन्नासोबत हाथी मेरे साथी या चित्रपटात त्यांची विशेष भूमिका राहिली.