बॉलिवूड गायक सोनू निगमच्या वडिलांच्या घरातून 72 लाख रुपयांची चोरी झाली आहे. गायकाच्या वडिलांनी त्याचा चालक रेहानवर चोरीचा संशय व्यक्त केला आहे. 22 मार्च रोजी सोनू निमगची बहीण निकिता हिने चालकाविरुद्ध चोरीची तक्रार दाखल केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या आहेत.
सोनू निगमच्या वडिलांनी रेहानविरोधात मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, रेहान नावाचा ड्रायव्हर आगम कुमारसोबत आठ महिन्यांपासून काम करत होता. मात्र, त्याची कामगिरी चांगली नव्हती. त्यामुळे त्याला कामावरून काढून टाकण्यात आले. १९ मार्च रोजी आगम कुमार वर्सोवा भागातील निकिताच्या घरी गेले होते. काही वेळाने ते परत आले असता त्यांना लाकडी कपाटात ठेवलेल्या डिजिटल लॉकरमधून 40 लाख रुपये गायब दिसले. त्यांनी निकिताला याबाबत माहिती दिली.
दुसरीकडे, दुसऱ्या दिवशी ते काही कामानिमित्त मुलाच्या घरी गेले असता, त्यांना परत येताना लॉकरमधून 32 लाख रुपये गहाळ झाल्याचे दिसले. अशाप्रकारे दोन दिवसांत त्यांच्या घरातून 72 लाखांची चोरी झाली आहे.
यानंतर आगम कुमार आणि निकिता यांनी त्यांच्या सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये ड्रायव्हर रेहान दोन्ही दिवशी बॅग घेऊन त्याच्या फ्लॅटकडे जाताना दिसत आहे. 22 मार्च रोजी सोनू निमगचे वडील आगम कुमार निगम यांनी वाहन चालकाविरुद्ध चोरीची तक्रार दाखल केली होती.