Sri Lanka Economic Crisis : श्रीलंकेत सध्या अन्न, इंधन आणि विजेच्या तुटवड्यामुळे नागरिकांचे हाल सुरु आहेत. मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष नर्माण झाला आहे. वेगवेगळ्या शहरांत लोक रस्त्यावर उतरले असून, त्यामुळे अनेक ठिकाणी हिंसक (Violence in Sri Lanka) घटना घडताना दिसत आहेत. लोकांनी जाळपोळ आणि दगडफेक करण्यास सुरुवात केली असून, अनेक ठिकाणी सार्वजनिक मालमत्तांचं नुकसान केलं आहे. त्यानंतर आता राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांनी देशात आणीबाणी (Emergency) लागू केली आहे.
देशात सध्या अनेक भागांत विज बंद असून, अन्नासाठी लोकांना तासंतास रांगेत उभं राहावं लागतंय. त्यामुळे लोकांच्या संयमाचा अंत झाल्याने अनेक लोक संतापून रस्त्यावर उतरले आहेत. देशात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि जीवनावश्य वस्तुंचा पुरवठा अंखंडित ठेवण्यासाठी १ एप्रिलपासून देशात आणीबाणी लागू करत असल्याचं देशाचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली असून, ५० पेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेतलं आहे. कोलोंबो आणि आसपासच्या परिसरात कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. देशात सध्या सत्तेत असलेल्या सरकारच्या चुकीच्या रणनितीमुळेच देशाची परिस्थिती अशी झाल्याचा जनतेचा आरोप आहे. त्यामुळे आता देशात शांतता प्रस्थापित करणं कठीण झालं आहे. शुक्रवारी रात्री लोकांनी राजपक्षे यांच्या घराकडे मोर्चा काढला होता. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठा संघर्ष झाला.
श्रीलंका १९४८ ला ब्रिटनपासून स्वातंत्र्य झाला. त्यानंतरची ही सर्वात वाईट परिस्थिती असल्याचं दिसतंय. कोरोना काळात देशावर आलेल्या आर्थिक संकटामुळेच ही परिस्थिती उद्भवली असून, पर्यटन व्यवसायात आलेली मंदी याचं कारण असल्याचं सरकारचं मत आहे. भरताने श्रीलंकेला या आर्थिक संकटातून बाहेर येण्यास मदत म्हणून ४० हजार टन डिझेल पाठवलं आहे.