वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री
अभ्यंगम् आचरेत् नित्यं स जरा श्रमवातहा
दृष्टी प्रसादः पुष्ट्यायुः स्वप्न सुत्वक्त्व दार्ढ्य कृत्
श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध करून 16000 राजकन्यांना बंदीवासातून मुक्त केलं होत, तो म्हणजेच आजचा नरक चतुर्दशीचा दिवस म्हणुन साजरा केला जातो. नरक चतुर्दशीच्या दिवशी भल्या पहाटे उठून, अभ्यंग स्नान करण्याची पद्धत आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली आहे. आयुर्वेदातही अभ्यंगाची भरभरून प्रशस्ती केलेली दिसते. नरक चतुर्दशी, पाडवा आणि भाऊबीज या तीन्ही दिवशी घराघरात अभ्यंग केलं जातं पण दीपावलीच्या निमित्तानी सुरू झालेलं अभ्यंग खरं तर पुढे वर्षभर करत राहायला हवं.
अभ्यंग म्हटलं, की बऱ्याचदा, रोज मालिश घ्यायला वेळ कुठे आहे? किंवा रोज मालिश कोणाकडून घेणार? असा प्रश्न विचारला जातो. पण आयुर्वेदाला अभिप्रेत असणारा रोजचा अभ्यंग हा स्वतःलाच करायचा असतो आणि त्यासाठी सहसा पाच-सहा मिनिटं, फार तर फार दहा मिनिटं पुरेशी असतात. हो, पण आयुर्वेदात सांगितलेले अभ्यंगाचे फायदे अनुभवायचे असतील तर त्यासाठी तेल, औषधी द्रव्यांनी संस्कारित केलेलं असायला हवं.
कच्चं तेल लावून केलेला अभ्यंग आणि आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे तेलावर अगोदर मूर्च्छना संस्कार करून, नंतर तेलाच्या एक चतुर्थांश कल्क आणि तेलाच्या चार पट काढा,पाठाप्रमाणे कधी दही, कधी दूध, कधी दह्याचं पाणी, कधी वनस्पतीचा रस अशा गोष्टी मिसळून सिद्ध केलेलं तेल वापरून केलेला अभ्यंग यात जमीन अस्मानाचा फरक असतो. नरक चतुर्दशीच्या निमित्तानीअशा छान अभ्यंगाची सुरुवात केली आणि नंतरही जमलं तर रोज, नाहीतर अधून मधून जरी अभ्यंग करत राहिलं तर आपणही शरीरातल्या विषरूपी नरकासुराचा वध करून 16,000 मेरिडियनना मुक्त करू शकतो आणि निरोगी राहु शकतो.अशा प्रकारे इतरही भारतीय प्रथा परंपरांमागचं विज्ञान समजून घ्यायचं असेल तर पहात रहा.
अभ्यंग स्नानाचे फायदे:
नियमित अभ्यंग केल्याने म्हातारपण दूर राहतं, म्हणजे वय वाढलं तरी प्रकृती उत्तम राहते.
श्रमामुळे आलेला थकवा दूर होतो.
शरीरातील वातदोषाचे शमन होतं.
डोळ्यांची शक्ती वाढते.
शरीरशक्ती वाढते.
दीर्घायुष्याच्या लाभ होतो.
झोप शांत लागते.
त्वचेवरचा रंग सुधारतो.
तसेच शरीराला दृढता येते.