वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री
आपल्याकडे दिवाळीत दारात रांगोळी काढण्याची पद्धत आहे. सध्या मात्र खऱ्या रांगोळीऐवजी रांगोळीचे स्टिकर्स लावण्याची पद्धत पडत चाललेली आहे. हे योग्य आहे का? भारतीय संस्कृतीतील प्रत्येक गोष्ट ही अतिशय विचारपूर्वक आणि सगळ्यांच्या कल्याणाच्या भावनेनीच योजलेली असते. त्यात शोधलेला शॉर्टकट हा सोयीचा वाटला तरी त्यातून मिळणाऱ्या फायद्यापासून वंचित ठेवणारा ठरू शकतो.
दारात काढलेली रांगोळी घराची शोभा वाढवणारी तर असतेच, पण संगमरवरीच्या दगडापासून बनवलेली रांगोळी चिमटीत धरून त्यापासून अप्रतिम डिझाइन तयार करण्याची किंवा मंडल काढण्याची प्रक्रिया ही आपल्यातील पृथ्वी तत्वाला समतोल करण्यास मदत करणारी असते. जणू ते एक प्रकारचं पृथ्वी घटकवर केलेलं ध्यानच असतं. रांगोळी थोडीशी उग्र असल्याने तिचं जमिनीवर केलेलं रेखाटन आणि त्यात भरलेले, हळदीकुंकवाचे रंग हे मुंगी-किड्यांना घरात येण्यास प्रतिबंध करण्याचंही काम करत असतात.
साधी रांगोळी काढायला पाच मिनिटं लागत असली, तरी या पाच मिनिटात मनाला विश्रांती मिळते. भिरभिरणाऱ्या विचारांना थोडीतरी मिळालेली उसंत आणि सर्जनशीलतेला मिळालेली चालना हे सगळे फायदे तयार रांगोळीचे स्टिकर्स लावल्यानी कसे बरं मिळतील? त्यामुळे दारात छोटी रांगोळी काढली तरी चालेल, पण कमीत कमी दीपावलीच्या उत्सवात दारात छान रांगोळी काढूयात आणि आपल्या ऋषीमुनींनी आखलेल्या योजनेचा उपयोग करून घेऊयात पुन्हा एकदा सगळ्यांना आजच्या पाडव्याच्या मनापासून शुभेच्छा!