लोकशाही न्यूज नेटवर्क
पश्चिम बंगालमध्ये येत्या दोन-तीन महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर गळती सुरू आहे. अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यातच तृणमूलचे राज्यसभा सदस्य दिनेश त्रिवेदी यांनी खासदारकीचा राजीनामा देत असल्याची घोषणा आज राज्यसभेत केली.
मी तृणमूल काँग्रेसचा खूप आभारी आहे, ज्यामुळे मी इथपर्यंत आलो आहे. पण राज्यात सध्या हिंसाचार सुरू असला तरी, आम्ही इथे काहीही बोलू शकत नाहीत. माझ्या राज्यातील हिंसाचाराबाबत मी काहीही करु शकत नाही, त्यामुळे मला गुदमरल्यासारखे होते, असे दिनेश त्रिवेदी म्हणाले. तू इथे बसून काही करू शकत नाही, तर तू राजीनामा दिला पाहिजे, असे माझे मन सांगते. म्हणूनच मी राजीनामा देत आहे. पण मी पश्चिम बंगालच्या लोकांसाठी काम करत राहीन, असेही ते म्हणाले.
देशहित डोळ्यासमोर ठेवून आपण राजकारणात येतो. देशहित हेच सर्वोच्च आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुलाम नबी आझाद यांनी देखील दोन दिवसांपूर्वी याच सभागृहात अशाच भावना व्यक्त केल्या होत्या, असे सांगून त्रिवेदी म्हणाले, कोरोना संकटातही भारताने चांगली कामगिरी केली. मोदींनी 130 कोटी नागरिकांना श्रेय दिले. पण नेतृत्व त्यांचेच होते.