शिवसेनेची पाळमुळ ठाण्यात रूजवणारे, ठाण्याचे बाळ ठाकरे, ठाण्याचा वाघ अशी ख्याती असलेल्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर एक भव्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. आज त्यांच्या जयंत्तीनिमित्त या चित्रपटाची घोषणा होतेय ही शिवसैनिकांसाठी मोठ गिफ्ट आहे. आता या चित्रपटाची उत्सुकता शिवसैनिकांना लागली आहे.
धाक, आदरयुक्त दरारा, समोरच्यांच्या उरात धडकी भरवणारी तिक्ष नजर, अन्याय करणाऱ्यांच्या पाठीवर आसूड ओढणारे असे व्यक्तीमत्व धर्मवीर आनंद दिघे यांचे होते. फक्त ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचले होते. या चित्रपटाची घोषणा होताच, "धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे" या चित्रपटाकडे लाखो शिवसैनिक डोळे लावून बसले आहेत. या चित्रपटाची निर्मिती सुरु झाली असून, या चित्रपटात दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेता मंगेश देसाई हे हा चित्रपट साकारणार आहेत. या चित्रपटासाठी प्रवीण तरडे, मंगेश देसाई शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदेशानुसार हा चित्रपट साकारण्यात येणार आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर येणाऱ्या या आगामी चित्रपटात आनंद दिघे यांची स्वतःच्या आवडीची आर्माडा गाडी वापरण्यात येणार आहे.
आज या चित्रपटाबाबत शिवसेना नेते आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती देतानाच हा चित्रपट भव्य दिव्य तर होईलच पण धर्मवीर आनंद दिघे यांच कार्य हे कदापि विसरता येणार नाही हे स्पष्ट केले. ठाणे जिल्हा आणि महाराष्ट्रात शिवसेना हि घराघरात पोहोचवण्यासाठी आणि प्रत्येकाच्या मनात शिवसेना रुजवण्यासाठी जे कार्य धर्मवीर आनंद दिघे यांनी केल आहे ते कमी नसून त्यांनी शिवसेनेसाठी केलेलं काम आणि कार्य हे नवीन पीडिला कळायला हवं, यासाठी हा चित्रपट साकारण्यात येणार असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
संपुर्ण महाराष्ट्र पालथा घातलेला 'ती' आर्माडा गाडी
आज धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी हजारो शिवसैनिक दाखल झाले होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील धर्मविरांच्या स्मृतीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. या स्मृती स्थळाजवळच एमएच ०५ – जी – २०१३ हि आर्माडा गाडी सर्वांच लक्ष वेधून घेत होती. स्मृती स्थळावर अभिवादन करून एकनाथ शिंदे सुद्धा या गाडीजवळ गेले आणि अगदी प्रेमाने गाडीवरून हाथ फिरवताना भावूक झाले होते. हि गाडी म्हणजे आनंद दिघे यांची ओळख होती. हि गाडी शिवसैनिकांच्या मनामध्ये आदराच स्थान करून राहिली आहे. याच गाडीने साहेबांनी प्रवास करून अक्षरशः महाराष्ट्र पालथा घातला होता. त्यामुळे या गाडी सोबत असंख्य भावनिक प्रसंग शिवसैनिकांसोबत जोडले गेले आहेत. हि गाडी ठाण्याच्या रस्त्यावरच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुद्धा धावत होती.
आनंद दिघे यांनी आपल्या याच गाडीतून ठाणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील खेडे, गावे शहरे डोंगर दऱ्या शिवसेना संघटना वाढवण्यासाठी पालथे घातले होते. या गाडीने प्रत्येक शिवसैनिकांच्या मनात वेगळ स्थान निर्माण केल होत. एक किलो मीटर वरून सुद्धा हि आपल्या साहेबांची गाडी आहे हे शिवसैनिक ओळखायचे आणि साहेब आले… असा गलका सुरु व्हायचा.. २० वर्षांपूर्वी याच गाडीतून प्रवास करत असताना आनंद दिघे यांच अपघातात निधन झालं होत. त्यानंतर सगळ्यांच्या आवडीची हि २०१३ आर्माडा गाडी हि रस्त्यावर कधीच दिसली नाही. आज दिघे यांच्या स्मृती स्थळा जवळ नव्या स्वरुपात हि आर्माडा गाडी पाहताच शिवसैनिक भावूक झाले होते.