कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर भारतात आता तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. डेल्टा या करोना विषाणूच्या नवीन प्रकाराने तज्ञांची चिंता वाढवली आहे. कोरोना लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींसाठीही 'डेल्टा व्हेरियंट' धोकादायक ठरत असल्याचं नुकतंच एका अभ्यासातून समोर आलंय. लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींना 'डेल्टा व्हेरियंट'नं गाठल्यास त्यांच्या शरीरातील अँटीबॉडीजचा परिणाम दुप्पट किंवा तिप्पट पटीनं घसरत असल्याचं समोर आलंय. 'इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च'कडून (ICMR) चेन्नईमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासात ही गोष्ट उघड झालीय.
आयसीएमआरच्या म्हणण्यानुसार, डेल्टा व्हेरियंट लसीकरण पूर्ण झालेल्या आणि लस न घेतलेल्या असा दोन्ही तऱ्हेच्या नागरिकांसाठी धोकादायक आहे. असं असलं तरी लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींचा धोका मात्र कमी होतो. आयसीएमआरचा हा अहवाल 'जर्नल ऑफ इन्स्पेक्शन'मध्ये १७ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आला.
डेल्टा किंवा B.1.617.2 हा करोनाचा व्हेरियंट लसीकरण न झालेल्या आणि लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींवर परिणाम करत असल्याचं दिसून आलं. जगभरात हा व्हेरियंट अत्यंत वेगानं फैलावलेला दिसून आला. भारतातील करोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी हा व्हेरियंट कारणीभूत ठरला.