देशात १८ वर्षांवरील तरुणांसाठी लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात येत्या १ मे पासून लसीकरण सुरु होणार आहे. लस घेण्यासाठी १८ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला आपल्या नावाची ऑनलाईन नोंदणी करणं अनिवार्य आहे. यासाठी आज सायंकाळी ४.०० वाजल्यापासून ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली आहे.
यासंदर्भातील नोंदणी प्रक्रिया आज दुपारी चार वाजल्यापासून कोविन अॅपवर सुरु झाली. मात्र ही नोंदणी सुरु झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये कोविन अॅपचा सर्व्हर डाऊन झाल्याची माहिती समोर येत आहे. सोशल नेटवर्किंगवर अनेकांनी यासंदर्भातील तक्रार नोंदवली असून स्क्रीनशॉर्ट पोस्ट केले आहेत. दुपारी चारच्या सुमारास १७ कोटी ८८ लाख भारतीय आरोग्य सेतू अॅपचा वापर करत होते अशी माहिती समोर आली आहे. आरोग्य सेतू तसेच कोविन अॅपवरुन नोंदणी केली तरी मूळ नोंदणीसाठी कोविनच्या अॅपवरच नोंदणी करणाऱ्यांना रिडायरेक्ट केलं जात असल्याने कोट्यावधी युझर्स एका वेळी नोंदणीसाठी आल्याने सर्व्हर क्रॅश झाल्याचे समजते.
१८ वर्षांवरील व्यक्तींसाठी लसीकरण सुरु झाल्यानंतर लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊन गोंधळ वाढण्याची शक्यता असल्यानं या वयोगटाला नोंदणी करणं आवश्यक आहे. मात्र, ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी ऑनसाईट रजिस्ट्रेशनचा अर्थात नोंदणी केंद्रावर जाऊनही नाव नोंदणी करण्याचा पर्याय अगोदरप्रमाणेच खुला राहीला आहे.