कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लसीचे संमिश्र डोस दिल्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने याबाबतची माहिती दिली आहे. या दोन्ही लसींची समिश्र डोस सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे कोरोना विषाणूविरुद्धच्या लढाईत भारताला आणखी यश मिळताना दिसत आहे.
कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लसींच्या मिक्स डोसचा परिणाम अधिक चांगला येत असून त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अधिक चांगली होते असं इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या ताज्या अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. दोन वेगवेगळ्या लसींचे डोस घेऊ नका असं या आधी सरकारकडून आवाहन करण्यात आलं होतं. आता ICMR च्या ताज्या अभ्यासानुसार, या दोन लसींचे 'मिक्सिंग अॅन्ड मॅचिंग' अधिक चांगला परिणाम दाखवतात असं सांगण्यात येत आहे.
वेल्लोरमधील ख्रिश्चियन मेडिकल कॉलेजला कोविड-१९ च्या मिश्र चाचणीची परवानगी मिळाली होती. केंद्रीय औषध नियमक मंडळाच्या एका समितीने ही शिफारस केली होती. त्याला मंजुरी दिल्यानंतर चाचणी करण्यास सुरुवात करण्यात आली होती.