बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीने तयार केलेले 'कोरोनील' अजूनही इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) रडारवर आहे. सेंट्रल ड्रग स्टँण्डर्ड कंट्रोल ऑरगानायझेशनने (सीडीएससीओ) कोरोनीलला कोरोनारुग्णावर उपचार करण्याचे प्रमाणपत्र व परवानगी दिली नसल्याचे आयएमएने उघड केले आहे. हा प्रकार पूर्णपणे सर्वसामान्यांची दिशाभूल करून त्यांच्या जीविताशी खेळणारा असल्याचे आयएमएने यापूर्वीच म्हटले होते.
'कोरोनील' या कोरोना प्रतिबंधक औषधाची दोन केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत दिमाखात घोषणा करण्यात आली होती. मात्र, इंडियन मेडिकल असोसिएनशनने (आयएमए) लगेचच याला तीव्र आक्षेप घेतला होता. हे औषध कोरोना रोखण्यास प्रभावी ठरत असेल तर, सरकार लसीकरणासाठी 35 हजार कोटी कशासाठी खर्च करीत आहे? असा संतप्त सवाल आयएमएने विचारला होता.
ड्रग कन्ट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) मान्यता दिल्याचे पतंजलीकडून जाहीर करण्यात आले. मात्र आयएमएचे महासचिव डॉ. जयेश लेले यांनी माहितीच्या अधिकारात याच्या प्रमाणपत्राबाबत पडताळणी केली. तेव्हा, सीडीएससीओने कोरोनीलला कोरोनाबाधितावर उपचार करण्यासाठी परवानगी अथवा प्रमाणपत्र दिले नसल्याचे स्पष्ट केले. कोरोनीलला फक्त एक औषधी उत्पादन म्हणून नियमांनुसार मान्यता देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.