पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) लोकसभेमध्ये काँग्रेसने संपूर्ण देशात कोरोना पसरवला असे वक्तव्य केले. या वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक झाली असून याचा निषेध करण्यासाठी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या नेतृत्वाखाली खासदार मनोज कोटक यांचे कार्यालय येथे आंदोलन करण्यात आलं. पंतप्रधानांनी माफी मागावी ही मागणी घेऊन काँग्रेस (Congress) आक्रमक झाली आहे. तर राम कदम यांनी काँग्रेसच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठं वक्तव्य केलं आहे.
आम्ही भाजपा कार्यकर्ते कॉंग्रेस नेत्यांच्या घरी आणि कार्यालयात जाणार. मात्र आज आर पार होऊनच जाऊ दे असा आक्रमक पवित्रा भाजप आमदार राम कदम यांनी घेतला आहे. तसंच आज आम्ही बघू कोणाच्या मनगटात किती ताकद आहे. आम्ही वाट पाहतोय या…असं आव्हान राम कदम (Ram Kadam) यांनी काँग्रेसला (Congress) दिलं आहे.
तर दुसरीकडे काँग्रेसच्या आंदोलनात कार्यकर्ते आक्रमक झाले असून, संघर्ष टाळण्यासाठी पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली आहे. आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या भाई जगताप यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.