लोकशाही न्यूज नेटवर्क
प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत झालेला हिंसाचार म्हणजे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बदनाम करण्याचे षङ्यंत्र असून याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरू आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला. मात्र, या रॅलीत मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. यात एकाचा मृत्यू तर, 83 पोलीस जखमी झाले. यावरून काँग्रेसने अमित शहा तसेच गुप्तचर यंत्रणेवर ठपका ठेवला आहे. वर्षभरातील ही दुसरी घटना आहे. गेल्या वर्षी देखील दिल्लीत हिंसाचार झाल होता. हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी म्हटले आहे.
समाजकंटकांविरोधात गुन्हे दाखल करण्याऐवजी सरकार शेतकरी आंदोलकांविरोधातच गुन्हे दाखल करत आहेत. यामुळे अमित शहा यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा घ्यायला हवा. परंतु हे होणार नाही. कारण याद्वारे त्यांना शेतकरी आंदोलन बदनाम करायचे आहे, असा आरोपही त्यांनी केला.
दीप सिद्धू कनेक्शन
लाल किल्ल्यावर समाजकंटकांनी घातलेल्या हैदोसाबद्दलही सूरजेवाला यांनी मोदी आणि शहांवर ठपका ठेवला आहे. भाजपाचे निकटवर्ती आणि मोदी-शहा यांचे चेले दीप सिद्धू यांची लाल किल्ल्यावरील उपस्थितीच हे आंदोलन बदनाम करण्याचा कट उघड करत असल्याचा दावा रणदीप सूरजेवाला यांनी केला.