लोकशाही न्यूज नेटवर्क
शेतकरी आंदोलनाशी संबंधित स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिचे कथित 'टूलकिट' समाजमाध्यमावरून प्रसारित केल्याच्या आरोपावरून 22 वर्षीय दिशा रवी पर्यावरण कार्यकर्तीला दिल्ली पोलिसांनी शनिवारी अटक केली. यावरून काँग्रेस आणि भाजपा आमने-सामने आले असून दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.
काँग्रेसचे वरिष्ठ नेता पी. चिदंबरम यांनी दिशा रवीच्या अटकेचा निषेध केला आहे. भारत हा मूर्खांचा रंगमंच बनत चालला असून पोलीस हे जुल्मी राज्यकर्त्यांचे साधन बनले आहे, हे दुर्दैवी आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंमबरम यांनी केली आहे. दिशा रवीच्या अटकेचा निषेध करून चिदंबरम यांनी, हुकूमशहा सरकारविरोधात आवाज उठविण्याचे आवाहन विद्यार्थी आणि तरुणांना केले आहे. तर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरीर थरूर यांनी या सर्व परकाराचा निषेध केला आहे. कार्यकर्ते तुरुंगात बंद आहेत, तर दहशतवादी जामिनावर बाहेर आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.
याबाबत भाजपाही आक्रमक झाली आहे. दिशा रवीच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी केलेला खुलासा धक्कादायकच आहे. हे टूलकिट देशाचे विभाजन करणारे होते. दिल्ली पोलिसांनी या टूलकिटच्या षड्यंत्राचा पर्दाफाश केला आहे. जे देश तोडायचे काम करत असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, असे भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी सांगितले.
देशविरोधाचे बीज ज्याच्या मनात आहे, ते समूळ नष्ट करण्याची गरज आहे. मग ती व्यकती दिशा रवी असो वा अन्य कुणी. देशाच्या धोरणांचा विरोध करणे हा गुन्हा आहे, असे मी म्हणत नाही. पण असा विरोध करण्यासाठी विदेशी शक्तींशी हातमिळवणी करणे हे देशविरोधी कृत्य समजले जाते, असे हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी म्हटले आहे.