लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्राच्यावतीने 'वारकरी संतपरंपरे'वर आधारित चित्ररथ यावर्षी प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या राजपथावरील संचलनासाठी सज्ज झाला आहे. महाराष्ट्रासह 17 राज्यांचे आणि 15 केंद्रीय मंत्रालयांचे असे एकूण 32 चित्ररथ राजपथावरील पथसंचलनात सहभागी होणार आहेत.
वारकरी संत व समकालीन संतांनी जाती व्यवस्था, विषमता आणि अंधश्रध्देविरोधात आवाज उठवत समाजप्रबोधनाचे महान कार्य केले आहे. हीच संतपरंपरा दर्शविणा-या महाराष्ट्राच्या चित्ररथावर वारकरी संप्रदायाचा पाया रचणा-या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची 8 फुट उंचीची आसनस्थ मूर्ती खास आकर्षण आहे.
चित्ररथाच्या मध्यभागी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि वारकरी संप्रदायाचे शिरोमणी संत तुकाराम महाराज यांच्या भेटीवर आधारीत 'भक्ती आणि शक्ती'चा संदेश देणारे प्रत्येकी 8 फुट उंचीचे फिरते पुतळे आहेत. या पाठोपाठ राज्यातील वारकरी संतांचे व भक्तांचे दैवत असणाऱ्या पांडुरंगाची कटेवर हात असणारी या चित्ररथावरील 8.5 फूट उंचीची लोभस मूर्ती आहे. चित्ररथाच्या शेवटच्या भागात 8 फूट उंचीचा 'संतवाणी' हा ग्रंथ उभारण्यात आला आहे व यावर संतांची वचने लिहिण्यात आली आहेत.
चित्ररथाच्या दोन्ही बाजूस संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत नामदेव, संत शेख महंमद, संत नरहरी, संत सावता, संत दामाजीपंत, संत गोरोबा, संत एकनाथ, संत सेना, संत चोखामेळा यांच्या मूर्ती उभारण्यात आल्या आहेत.
चित्ररथाचे संकल्पनाचित्र तसेच, त्रिमिती प्रतिकृती नागपूर येथील टीम शुभचे रोशन इंगोले (केळझर, वर्धा) आणि तुषार प्रधान (यवतमाळ) या कलाकारांनी तयार केले आहेत. कला दिग्दर्शक नरेश चरडे आणि पंकज इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 30 कारागिरांनी अतिशय आकर्षक चित्ररथ उभारला आहे.