अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर बँकिंग क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. बँकाच्या विलनीकरणानंतर अनेक बँकांचे चेकबुक, पासबुक आणि आयएफएससी कोडमध्ये मोठे बदल होणार आहेत. १ एप्रिलनंतर देशातील सात बँकांच्या ग्राहकांना दैनंदिन बँक व्यवहारांमध्ये बडा होऊ शकतो . एक एप्रिल २०२१ पासून अनेक बँकांची जुने चेकबुक आणि आयएफएससी कोड निष्क्रीय होणार आहेत. त्यामुळे या सात बँकांमध्ये खाती असणाऱ्या ग्राहकांनी आपला नवीन कोड जाणून घेणं फायद्याचं ठरू शकेल.
यामध्ये देना बँक, विजया बँक, कॉर्पोरेशन बँक, आंध्रा बँक, ओऱिएंटल बँक ऑफ कॉमर्स, यूनायटेड बँक आणि इलाहाबाद या बँकांचा समावेश आहे. जर तुमचे खाते या बँकमध्ये असेल तर ग्राहकांनी त्यांच्या बँक शाखेशी संपर्क करुन नव्या चेकबुक आणि आयएफएससी कोडसंदर्भात माहिती घेणं फायद्याचं ठरेल.
आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँकेमध्ये खातं असणाऱ्या ग्राहकांना बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरुन लॉगइन करण्यासाठी नव्या आयएफएससी कोडचा वापर करु शकतात. याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी ग्राहकांना www.unionbankofindia.co.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. तसेच बँकेच्या कस्टमर केअर क्रमांकांवर १८००२०८२२४४ अथवा १८००४२५१५१५ अथवा १८००४२५३५५५ वर फोन करुन ग्राहक माहिती घेऊ शकतात.
IFSC Code कशासाठी वापरतात
भारतामध्ये बँकांची संख्या जास्त आहे. ऑनलाइन ट्रांजेक्शन सुरळीत होण्यासाठी प्रत्येक बँकेने आपल्या शाखेला एक कोड दिला आहे. या कोडला IFSC कोड असे म्हणतात. ऑनलाइन ट्रांजेक्शन करण्याकरिता IFSC कोड म्हणजेच इंडियन फाइनेंशियल सिस्टम कोडची गरज पडत असते.