ब्रिटनमध्ये बीबीसी आशियाई नेटवर्कवरील 'बिग डिबेट' रेडिओ शो लाइव्ह सुरू असताना त्यात सहभागी झालेल्या एका वक्त्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईबद्दल अपशब्द वापरले. यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
ब्रिटनमध्ये वास्तव्यास असलेले शीख तसेच इतर भारतीयांबद्दलच्या वांशिक भेदभावासंबंधी ही चर्चा सुरू होती. मात्र अचानक ही चर्चा भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाकडे वळली. एका 'कॉलर'ने पंतप्रधान मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरले. त्यातील अँकरने त्या व्यक्तीला रोखण्याचा प्रयत्न केल्याचे जाणवते.
आता याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरून नेटिझन्सनी याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. सोशल मीडियावर Boycott BBC आणि Ban BBC हे हॅशटॅग ट्रेण्ड झाले आहेत. अनेकांनी या शोचे सादरकर्ते आणि बीबीसीवर कडाडून टीका केली आहे. बीबीसीने हे आक्षेपार्ह वक्तव्य ऑन एअर जाऊ का दिले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तर अनेकांनी चीनप्रमाणेच भारतात बीबीसीवरही बंदी आणण्याची मागणी केली आहे. तथापि, यासंदर्भात बीबीसीकडून अद्याप कोणतेही निवेदन जारी करण्यात आलेले नाही.