नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने आर्थिक वर्ष 2022-23 साठी ईपीएफ खात्याचा व्याज दर वाढवला आहे. आता ईपीएफ खात्यावर 8.15 टक्के व्याज मिळणार आहे. पूर्वी तो 8.10 टक्के होता. केंद्रीय वित्त मंत्रालयाने भविष्य निर्वाह निधी योगदानासाठी व्याजदरात वाढ घोषित केली आहे. EPFO ने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, बोर्डाने यावर्षी मार्चमध्ये व्याजदर 8.10 टक्क्यांवरून 8.15 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव दिला होता. सीबीटीच्या शिफारशीनंतर व्याजदर अर्थ मंत्रालयाकडून अधिसूचित केले जातात. त्यानंतरच ते EPFO सदस्यांच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात. यानुसार ऑगस्ट 2023 पासून व्याजाचे पैसे खात्यात पोहोचण्यास सुरुवात होईल.
कर्मचाऱ्याच्या पगारावर 12 टक्के कपात ईपीएफ खात्यासाठी आहे. कर्मचार्यांच्या पगारातून नियोक्त्याने केलेल्या कपातीपैकी 8.33 टक्के रक्कम EPS (कर्मचारी पेन्शन योजना) पर्यंत पोहोचते, तर 3.67 टक्के EPF मध्ये पोहोचते. तुम्ही तुमच्या पीएफ खात्याची सध्याची शिल्लक घरबसल्या सोप्या पद्धतीने तपासू शकता. यासाठी अनेक पर्याय देण्यात आले आहेत. उमंग अॅप, वेबसाइट किंवा तुमच्या मोबाइल फोनवरून एसएमएस पाठवून तुम्ही हे जाणून घेऊ शकता. देशभरात सुमारे 6.5 कोटी EPFO चे ग्राहक आहेत.
EPFO पोर्टलवरून तपासा पासबुक
EPFO च्या अधिकृत वेबसाइटवर जा (www.epfindia.gov.in)
यानंतर ई-पासबुक या पर्यायावर क्लिक करा.
UAN, पासवर्ड आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि लॉगिन वर क्लिक करा.
लॉग इन केल्यानंतर, पासबुक पाहण्यासाठी सदस्य आयडी पर्याय निवडा.
आता तुम्हाला पासबुक पीडीएफ फॉरमॅटमध्ये मिळेल, हे डाउनलोड केले जाऊ शकते.
तुम्ही https://passbook.epfindia.gov.in/ वर जाऊन थेट पासबुक पाहू शकता.