लोकशाही न्यूज नेटवर्क
राजधानी दिल्लीत काल (मंगळवार) झालेल्या हिंसाचारावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. भाजपा विरुद्ध विरोधी पक्ष असे चित्र आहे. याबाबत भाजपाने काँग्रेसवर खापर फोडले आहे. काँग्रेसनेच याला चिथावणी दिल्याचा आरोप भाजपाने केला आहे. तर, शेतकरी आंदोलन सुरूच राहील, असे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी स्पष्ट केले.
कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत त्यांनी काल (मंगळवार) ट्रॅक्टर रॅली काढली होती. पण त्याला हिंसक वळण लागले. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बदनाम करण्याचे हे षङ्यंत्र असून याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. तर, काँग्रेस नेते राहुल गांधी हे शेतकऱ्यांचे समर्थन करीत नव्हते तर, त्यांन चिथावणी देत होते, असा आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.
ज्यांनी कोणी 26 जानेवारीला शेतकऱ्यांना भडकवले, त्यांच्याविरुद्ध कारवाई झाली पाहिजे. लाल किल्ल्यावर काल तिरंग्याचा झालेला अपमान भारत सहन करणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया जावडेकर यांनी दिली. सरकारने शेतकऱ्यांशी चर्चेच्या अनेक फेऱ्या केल्या. कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे कोणते अधिकार कमी होणार आहेत? उलट या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना लाभ देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. काँग्रेस हे जाणून आहे. पण तरीही, ते तसे होऊ देत नाही, असा आरोप त्यांनी केला.
आंदोलन बदनाम करण्याचा डाव
प्रजासत्ताक दिनी जे काही झाले त्याला पोलीस प्रशासन जबाबदार आहे. लाल किल्ल्यापर्यंत कुणी पोहोचेल आणि पोलिसांकडून एकही गोळी झाडली गेली नाही, हे संशयास्पद आहे. शेतकरी आंदोलन बदनाम करण्याचा हा डाव आहे. पण हे आंदोलन सुरूच राहणार आहे, असे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी जाहीर केले. तर, दुसरीकडे ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने 1 फेब्रुवारी रोजी नियोजित संसदेवरील मोर्चा रद्द केला आहे.