भारतीय संरक्षण दलांचे प्रमुख बिपिन रावत यांचं हेलिकॉप्टर कोसळून निधन झाल्यानतंर, या दुर्घटनेसाठी भारतीय लष्करातील त्रुटी जबाबदार असल्याचं असा चीनने पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे. चीनने ग्लोबल टाईम्समधील लेखात बिपिन रावत यांच्या निधनावर बोलताना यातून भारतीय लष्करातील शिस्तीची कमतरता तसंच लढण्याची अपूर्ण तयारी दिसत असल्याचा कांगावा केला आहे.
ग्लोबल टाईम्समध्ये यावेळी बिपिन रावत यांचा उल्लेख चीनविरोधी असा करण्यात आला आहे. आणखी एका चिनी तज्ज्ञाच्या हवाल्याने ग्लोबल टाइम्सने भारतीय लष्करात बेशिस्तपणा असून अनेकदा भारतीय सैन्य प्रक्रिया तसंच नियमांचं पालन करत नाही असं सांगण्यात आलं आहे. चीनने यावेळी २०१९ मध्ये भारतीय विमानाला लागलेली आग आणि २०१३ मध्ये भारतीय पाणबुडीत झालेला स्फोट यांचा उल्लेख करत या सर्व मानवी चुका असल्याचा दावा केला आहे.
नुकतीच झालेली ही दुर्घटना टाळता आली असती. उदाहरणार्थ, जोपर्यंत हवामानात सुधारणा होत नाही तोपर्यंत उड्डाण थांबवलं असतं, पायलटने अधिक काळजीपूर्वक किंवा कुशलतेने उड्डाण केलं असतं किंवा हेलिकॉप्टरची कर्मचाऱ्यांनी योग्य काळजी घेतली असती असं सांगत चीनने पुन्हा एकदा भारतीय लष्करातील त्रुटी असा उल्लेख केला.