मयुरेश जाधव| बदलापूर: येथील तरूण वन्यजीव छायाचित्रकार प्रतीक प्रधान यांच्या दोन छायाचित्रांना इटली आणि रशियातील स्पर्धांमध्ये मानाची आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळाली आहे. या महोत्सवांमधून पारितोषिक मिळविणारा प्रतीक हा पहिला भारतीय ठरला आहे. मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाजवळ प्रतीकने काही महिन्यांपूर्वी सी-गल पक्षांच्या थव्याचे एक अतिशय सुंदर छायाचित्र टिपले होते. त्या छायाचित्रास इटलीतील अॅस्पेरिका आंतरराष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेत पहिले पारितोषिक मिळाले.
प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि ७५० युरो असे पुरस्काराचे स्वरूप आहे. त्याचबरोबर रशियातील गोल्डन टर्टल फेस्टिव्हलमध्ये प्रतीकच्या 'सापाचा सापळा' या छायाचित्रास द्वितीय पारितोषिक मिळाले. प्रतीक आणि याने अंबरनाथ, कर्जत, मुरबाड तालुक्यातील जंगलात भटकंती करून छायाचित्रे काढली आहेत. त्यांच्या त्या छंदातून अनेक दुर्मीळ किटक, वनस्पती त्यांनी त्यांच्या कॅमेरात टिपल्या आहेत. अथक प्रयत्न, चिकाटी आणि निरीक्षणांतून वन्यप्राण्यांच्या अतिशय दुर्मीळ भावमुद्रा कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त करण्यात तो यशस्वी झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पारितोषिक मिळविणारा हा पहिला भारतीय आहे.