यूट्युबर गौरव वासन मदतीने सर्वांसमोर आलेल्या 'बाबा का ढाबा'चे मालक कांता प्रसाद यांच्यावर आपलं नवं रेस्टॉरंट बंद करण्याची वेळ आली आहे. कोरोनाचा परिणाम त्यांच्यावर झालेला दिसून येतोय. लॉकडाऊनच्या काळात त्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे आता कांता प्रसाद यांनी पुन्हा दिल्लीतील आपल्या जुन्या जागेत व्यवसाय सुरु केला आहे.
गेल्यावर्षी यूट्युबर गौरव वासन याने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हीडिओमुळे 'बाबा का ढाबा' रातोरात प्रसिद्ध झाला होता. कोरोना काळात उदरनिर्वाह ठप्प झाल्याने 'बाबा का ढाबा' चालवणारे 80 वर्षीय वृद्ध दांपत्य अक्षरशः हालाखीचे जीवन जगत होते. मात्र, युट्यूबर गौरव वासनने या दाम्पत्याचा केलेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आणि त्यांच्या ढाब्यावर अक्षरशः लोकांची रांग लागली होती.
या माध्यमातून कांता प्रसाद यांना तब्बल 45 लाख रुपयांची देणगी मिळाली होती. याच पैशातून कांता प्रसाद यांनी नवीन रेस्टॉरंट सुरु केले होते. याचा महिन्याचा खर्च साधारण लाखभर रुपयांचा होता. मात्र, लॉकडाऊनमुळे हा खर्च कांता प्रसाद यांना आता परवडत नाही आहे. त्यामुळे कांता प्रसाद यांनी हे रेस्टॉरंट बंद करुन आपल्या जुन्या जागेतच व्यवसाय सुरु केला आहे.