सचिन बडे -
औरंगाबाद : लोकशाही न्यूजच्या एक आठवड्यापूर्वी वर्तवलेल्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. औरंगाबाद विभागातील (Aurangabad Division) दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा (Board Exam) निकाल उशिरा लागणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. दहावी आणि बारावीच्या प्राचार्य तथा मुख्याध्यापकांना औरंगाबाद बोर्ड अध्यक्षांनी याप्रकरणी नोटीस बजावली आहे.
दहावी बारावीच्या परीक्षांच्या निकालामध्ये विलंब होईल या संदर्भात एक आठवड्यापूर्वी लोकशाही न्यूजने अंदाज वर्तवला होता. इतर मंडळातील 90% पेपर तपासणी पूर्ण झाली असून, औरंगाबाद जिल्ह्यातील पेपर तपासणी मात्र संथगतीने सुरु आहे. दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी शिक्षकांना अडचणी येत होत्या. पेपर तपासणीची गती वाढवावी अशा सुचना या पत्रकातून करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, बोर्डाने याप्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला असून, पेपर तपासणीची गती न वाढवल्यास शाळेची मंडळाकडून मान्यता काढून घेण्यात येईल असा धमकी वजा इशारा देण्यात आला आहे. बस सुरू नसल्याने आणि विनाअनुदानित शाळा कृती समितीने उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेल्या बहिष्कारामुळे मंडळाच्या अडचणीत वाढ झाली आहे.