शनिवारी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या क्रूझ जहाजावर छापा टाकला. क्रूझवर ड्रग पार्टी आयोजित केल्याबद्दल एनसीबीला कळले, त्यानंतर वेशातंर करुन अधिकारी पार्टीत सामील झाले होते. बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानही या पार्टीत उपस्थित होता. आर्यन खानला एनसीबी कार्यालयात चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आली आहे. तसेच तो सध्या नाकरोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीच्या ताब्यात आहे. या प्रकरणामुळे भारतातील अंमली पदार्थांबाबतचा कायदा आणि त्यामधील शिक्षेच्या तरतुदी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
सध्या आर्यन एनसीबीच्या कोठडीत असून, येत्या काळात त्याच्यापुढच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एनसीबीच्या माहितीनुसार आर्यनसह ताब्यात असणाऱ्या इतर लोकांकडून कोकेन, चरस आणि एमडी असे नशेचे पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरणी आज दुपारी २.३० वाजता न्यायालयात सुनावणी होणार आहे. यावेळी आर्यन खान, अरबाज मर्चेंट, मुनमुन धमेचा यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
एनसीबीने केलेल्या कारवाईमध्ये आर्यनसह एकूण १० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सगळ्यांवर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गंत (एनडीपीएस अॅक्ट) कलम २० बी, ८(सी)२७ आणि ३५ सह अन्य कलम लावण्यात आले आहेत. २० (बी) कलमांतर्गंत जो कोणी या कायद्याचे उल्लंघन करतो किंवा दिलेल्या नियमांचे वा अटींचे पालन करत नाही. थोडक्यात, मादक पदार्थांची आंतरराज्यीय आयात- निर्यात केल्यास त्याला १० वर्षांची शिक्षा आणि १ लाख रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.
मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने या तरतुदीमध्ये बदल केला आहे. आता ड्रग्सच्या प्रमाणावरून शिक्षा ठरणार नाही तर प्रकरणाचे गांभीर्य आणि सेवन करणाऱ्याचा हेतू पाहून किमान १० आणि कमाल २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली जाऊ शकते. तसेच किमान १ लाखांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो. काही गंभीर प्रकरणात न्यायालय ड्रग्सच्या व्यावसायिकाला स्वविवेकाने मृत्युदंडाची शिक्षा सुनाऊ शकते.