मेळघाटातील हरीसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी गोळी झाडून आत्महत्या केली होती. याप्रकरणी अटक करण्यात आलेला डीएफओ विनोद शिवकुमार याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्याच्याविरोधात संतप्त महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. विनोद शिवकुमार याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
दीपाली चव्हाण यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमधून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. मुख्यत:, डीएफओ विनोद शिवकुमार याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे यात स्पष्ट झाले. त्यामुळे धारणी पोलिसांनी शिवकुमार याला अटक करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. तर, आज शेकडो महिलांनी पोलीस ठाण्यात धडक देत आरोपी शिवकुमारला ताब्यात देण्याची मागणी केली.
शिवकुमारला कोर्टात नेत असताना महिला मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्या होत्या. ज्या वाहनांतून शिवकुमारला पोलीस धारणी न्यायालयात घेऊन जात होते, त्या वाहनाला महिलांनी पूर्णपणे घेरले होते. त्यामुळे पोलिसांनी मानवी साखळी करून आरोपीला कोर्टात हजर केले. त्यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी खुद्द वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी केली.