कोरोना काळात महागाईमुळे लोकं त्रस्त झाले आहेत. खाद्यपदार्थांपासून ते पेट्रोल आणि डिझेलपर्यंत सर्व काही महागले आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे. आता अमूलने ग्राहकांना झटका दिला आहे. अमूल दूधाचे दर वाढवण्यात आले आहे. गुजरात सहकारी दूध विपणन महासंघने बुधवारी अमूल दूधाची किंमत १ जुलैपासून सर्व ब्रँडमध्ये २ रुपयांनी वाढविण्यात येणार आहे, असे जाहीर केले.
अमूलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जवळपास एक वर्ष आणि सात महिन्यांच्या अंतरानंतर किंमतीत वाढ केली आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्याने किंमती वाढविणे आवश्यक झाले होते. अमूल ब्रँडचे दूध आणि डेअरी उत्पादनाचे विपणन करणारे जीसीएमएमएफ व्यवस्थापकीय संचालक आरएस सोढी म्हणाले की, उद्यापासून संपूर्ण भारतात अमूल दूधाची किंमत २ रुपये प्रति लीटरने वाढवली जाईल. नवीन किंमत सर्व अमूल दूध ब्रँड म्हणजेच गोल्ड, ताजा, शक्ती, टी-स्पेशल तसेच गायीचे आणि म्हशीचे दूध यासर्वांवर लागू होणार आहे.
आता अमूल दूधाची किंमत वाढल्याने १ जुलै म्हणजेच उद्यापासून ग्राहकांना अमूलच्या फूल क्रीम दूधासाठी एक लीटर पॅकला ५७ रुपये द्यावे लागणार आहे. तर ग्राहकांनी फूल क्रीम दूधाच्या अर्ध्या लीटरच्या पॅकला २९ रुपये द्यावे लागणार आहे.