कोरोना महामारीमुळे गेल्यावर्षी अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली होती. मात्र यंदा ही यात्रा होणार आहे. 28 जूनपासून ही यात्रा सुरू होणार असून 22 ऑगस्टला ती संपेल. येत्या 1 एप्रिलपासून यासाठी भाविकांची नोंदणी सुरू होणार आहे.
जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली अमरनाथ देवस्थान मंडळाची बैठक झाली. या बैठकीत अमरनाथ यात्रेचा कालावधी निश्चित करण्यात आला. सुरक्षिततेच्या दृष्टीने ही यात्रा 56 दिवस चालणार आहे. 22 ऑगस्टला रक्षाबंधन असून या दिवशी यात्रेची समाप्ती होणार आहे. दोन्ही मार्गांवरून दररोज प्रत्येकी 10 हजार भाविकांना दर्शनासाठी पाठविण्यात येईल. तसेच यावेळी कोरोनाबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे.
या यात्रेसाठीची आगाऊ नोंदणी 1 एप्रिलपासून सुरू होणार आहे. पंजाब नॅशनल बँक, जम्मू अॅण्ड काश्मीर बँक, येस बँक यांच्या देशभरातील 446 शाखांमध्ये ही नोंदणी करता येईल.