आजपासून मुंबईत अनलॉक करण्यात आले असून मुंबईकरांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. याचदरम्यान तिसऱ्या स्तरात असलेल्या मुंबईत दुकानांना ४ वाजेपर्यंत मुभा आहे. यामध्ये सलून, ब्युटी पार्लर आणि स्पा यांचाही समावेश आहे. दरम्यान त्यांना एसी सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. एसी सुरु ठेवल्यास कारवाईचा इशारा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.
यादरम्यान "सलून, ब्युटी पार्लर आणि स्पा यांना परवानगी देण्यात आली असून ४ वाजेपर्यंत सुरु असतील. मात्र त्यांना एसी सुरु ठेवण्यास परवानगी नाही. जर एसी सुरु असला तर दंडही होऊ शकतो. एसीच्या माध्यमातून विषाणूंचा फैलाव होण्याची शक्यता असते," असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे. मुंबईत रात्री ८ नंतर जमावबंदी आणि संचारबंदी एकत्रित सुरु राहील असंही यावेळी त्यांनी सांगितलं.
कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठीच लोकल अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यासांठी सुरु असून बसमध्येही फक्त बसून प्रवाशाची परवानही आहे. उभं राहून प्रवास करण्या मनाई आहे. पाचव्या स्तरातून येणाऱ्या जिल्ह्यातील वाहनांना मुंबईत परवानगी नाही," असंही त्यांनी यावेळी सांगितलं.