अयोध्येत जमीन खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग (Sanjay Singh) यांनी केली होता. या आरोपांनंतर देशभरात खळबळ माजली असून याचवेळी त्यांच्या घऱावर हल्ला झाला आहे. या हल्ल्यानंतर संजय सिंग यांनी ट्विट करून भाजपला जाहीर आव्हान दिले आहे.
संजय सिंग (Sanjay Singh) यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "माझ्या घरावर हल्ला झाला आहे. भाजपावाल्यांनी कान उघडे ठेवून ऐकावं, कितीही गुंडगिरी केली तरी प्रभू श्रीरामाच्या नावे बनणाऱ्या मंदिराचा पैसा चोरी होऊ देणार नाही. त्यासाठी माझी हत्या झाली तरी बेहत्तर".
आरोप काय?
'आप'चे खासदार संजय सिंह यांच्या दाव्यानुसार, राम जन्मभूमीलगत (Ram Janmabhoomi) असणाऱ्या या जमिनीची १८ मार्च २०२१ रोजी खरेदीसाठी नोंदणी करण्यात आली आणि त्या वेळी जमिनीची किंमत २ कोटी दाखवण्यात आली. सपचे नेते पवन पांडे यांनी दोन मूळ मालकांची, तसेच दोन खरेदीदारांची नावे पत्रकार परिषदेत उघड केली. या खरेदीदारांनी ही जमीन ५.७ कोटी रुपयांना खरेदी केली. हा जमीन खरेदीचा व्यवहार झाल्यानंतर दोन्ही खरेदीदारांनी पुढील १० मिनिटांमध्ये ही जमीन राम जन्मभूमी न्यासाला १८.५ कोटींना विकल्याचा दावाही या नेत्यांनी केला.