सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती म्हणून देशातील विविध राज्यातील नऊ न्यायमूर्तींनी आज एकाचवेळी शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती पदावर एकाचवेळी ९ जणांनी शपथ घेण्याचा हा एक एतिहासिक प्रसंग म्हणून नोंद झाली आहे. पहिल्यांदाच इतका मोठा शपथविधी सोहळा पार पडला. शपथ घेतलेल्या न्यायमूर्तींमध्ये तीन न्यायमूर्ती या महिला न्यायमूर्ती आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी एकाचवेळी नऊ न्यायाधीशांना आज शपथ दिली. या ९ न्यायाधीशांमध्ये तीन महिला न्यायाधीशांचा समावेश आहे. न्यायालयाच्या अतिरिक्त भवन परिसरातील सभागृहात या शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. सरन्यायाधीश एन. वी. रमण यांनी नऊ न्यायाधीशांना शपथ दिली. श्रीनिवास ओका, विक्रम नाथ, जितेंद्र कुमार माहेश्वरी, हिमा कोहली, बीवी नागरत्ना, सीटी रविकुमार, एमएम सुंदरेश, बेला एम त्रिवेदी आणि पीएस नरसिम्हा यांनी शपथ घेतली. कोरोनाच्या निर्बंधांमुळे हा कार्यक्रम मर्यादित स्वरूपात पार पडत आहे.
आज ९ न्यायाधीशांच्या नियुक्तीमुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ही ३३ होणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील कमाल न्यायाधीशांची संख्या ही ३४ इतकी आहे. सरन्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली १७ ऑगस्टला झालेल्या बैठकीत ९ नवीन न्यायाधीशांच्या नावाला मंजुरी दिली होती. २०१९ नंतर एकाही न्यायाधीशाची नियुक्ती झाली नव्हती. १७ नोव्हेंबर २०१९ रोजी माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई निवृत्त झाल्यापासून नियुक्त्या रखडल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने नऊ नावांची शिफारस २२ महिन्यांनंतर पाठवली होती.