उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि राजस्थानमध्ये (Rajasthan) वीज कोसळून (Lightning) जवळपास 61 जणांचा मृत्यू (Death Toll) झाला आहे. उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या जिल्ह्यात वीज पडून 41 जणांचा मृत्यू झाला आहे. येथील सर्वाधिक मृत्यू प्रयागराज (Prayagraj) जिल्ह्यात झाले आहेत.
या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुःख व्यक्त केले आहे. राजस्थानमधील काही भागात वीज कोसळल्याने अनेक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. या घटनेमुळे दुःख झाले आहे. मृतांच्या कुटुंबीयांबद्दल मी तीव्र संवेदना व्यक्त करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटद्वारे म्हटले आहे.
उत्तर प्रदेश सरकारच्या म्हणण्यानुसार, प्रयागराजमध्ये वीज कोसळून सर्वाधिक 14 जणांचा मृत्यू झाला आहे. कानपूर देहात आणि फतेहपूरमध्ये प्रत्यकी 5 मृत्यू झाले आहेत. कौशांबीमध्ये 4 लोकांचा मृत्यू, फिरोजाबादमध्ये 3 लोकांचा मृत्यू, उन्नाव-हमीरपूर-सोनभद्रात प्रत्येकी 2 मृत्यू, कानपूर नगर-प्रतापगड-हरदोई-मिर्जापूरमध्ये प्रत्येक एक मृत्यू झाला आहे. याशिवाय, 22 लोक जखमी झाले आहेत, तर 200 हून अधिक जनावरांचाही मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने मदत करण्याचे निर्देशन दिले आहेत. दरम्यान, रविवारी संध्याकाळी उशिरा उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान अधिक खराब झाल्याची देण्यात आली होती. पावसाबरोबरच अनेक ठिकाणी वीज कोसळल्याच्या घटना घडल्या.
दुसरीकडे, राजस्थानमध्ये वीज कोसळल्याने जवळपास 20 जणांचा मृत्यू झाला. सरकारी आकडेवारीनुसार, राजस्थानमध्ये वीज कोसळल्याने मृतांचा आकडा रविवारी 20 वर पोहोचला आहे. यापैकी जयपूरमध्ये 11, धौलपूरमध्ये 3, कोटामध्ये 4, झालावाडमध्ये 1 आणि बारानमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.