अशी आहे यूएस कॅपिटॉल
लोकशाही न्यूज नेटवर्क | अमेरिकन काँग्रेसने डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केलंय… त्याचबरोबर अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सत्ता हस्तांतरणासाठी तयार झाले असून २० जानेवारीला हे हस्तांतरण करणार असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. पण याआधी ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी वॉशिंग्टनमधील डीसीमीधील कॅपिटॉल इमारतीमध्ये घुसून हिंसाचार केला. जाणून घेऊयात कॅपिटॉल इमारतीची माहिती
भारताच्या संसद भवनातील लोकसभा आणि राज्यसभेप्रमाणचे दोन सभागृह कॅपिटॉल इमारतीत आहेत. यूएस कॅपिटॉल बिल्डिंग वॉशिंग्टनच्या कॅपिटल हिलवर आहे. कॅपिटॉल इमारतीत अमेरिकन काँग्रेसचे सदरस्य बसतात. या इमारतीत दोन सभागृह आहेत. त्यांना हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह आणि सिनेट असं ओळखलं जातं. या इमारतीचं बांधकाम १८००मध्ये पूर्ण झाले. कालांतराने त्याचा विस्तार करण्यात आला. यावर मोठं घुमट असून त्याच्या दक्षिण विंग हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह तर, उत्तर विंग सिनेट सदस्यांसाठी आहे. अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांनी या कायदे मंडळाच्या वास्तूचे नामकरणासाठी काँग्रेस हाऊस याऐवजी कॅपिटॉल या नावाला पसंती दिली.
या वास्तूची उभारणी कशी झाली, याची माहितीही रोचक आहे. १७९२च्या हिवाळ्यात कॅपिटॉलच्या वास्तूरचनेसाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी आराखडा सादर करण्यासाठी ४ महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. विजेत्याला ५०० डॉलर्सचे बक्षीसही देण्यात येणार होते. स्टिफन हॅलेट यांचा आराखडा सर्वांच्या पसंतीस उतरला. पण त्यावर फ्रेंच वास्तूरचनेची छाप होती. त्यानंतर उशिराने म्हणजेच ३१ जानेवारी १७९३ रोजी विलियम थॉर्टोन यांनी आराखडा सादर केला आणि त्याची भव्यता, साधेपणा आणि रेखीवपणा सर्वांनाच आवडला.
विलियम थॉर्टोन यांच्याच डिझाइनवर शिक्कामोर्तब झाले आणि ही वास्तू उभी राहिली. पण गुरुवारी या वास्तूत झालेल्या हिंसाचाराचे गालबोट या सौंदर्याला लागले आहे. जसा काळ सरत जाईल अन् या सौंदर्यावरचे हे व्रण सर्वांना दिसले नाहीत तरी, अनेकांना ते जाणवत राहतील…