झुकेंगे नही.. जय महाराष्ट्र!!! संजय राऊतांचं नवं ट्विट

झुकेंगे नही.. जय महाराष्ट्र!!! संजय राऊतांचं नवं ट्विट

Published by :
Published on

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र पाठवून थेट सक्तवसुली संचलनालयाला (ED)आव्हान दिले आहे. आज सकाळपासूनच संजय राऊत यांनी ईडीवर टाकलेल्या या लेटरबॉम्बची प्रचंड चर्चा रंगली आहे. अशातच आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये डरकाळी फोडणाऱ्या वाघाचा छायाचित्र आहे. या ट्विटसोबत संजय राऊत यांनी, 'झुकेंगे नही.. जय महाराष्ट्र…', असा मजकूर लिहला आहे.

तत्पूर्वी संजय राऊत यांनी बुधवारी दिल्लीत घेतलेल्या पत्रकारपरिषदेत ईडीवर प्रचंड आगपाखड केली होती. मी उपराष्ट्रपतींना पाठवलेले पत्र हा ट्रेलरही नाही. येत्या काही दिवसांमध्ये ईडीचे अधिकारी कशाप्रकारे सिंडिकेट चालवतात, हे मी उघड करेन. ईडीच्या अधिकाऱ्यांवरच आर्थिक घोटाळ्याचे गुन्हे आहेत. या अधिकाऱ्यांचे बाहेर वसूली एजंट आहेत. त्यांच्या माध्यमातून ईडीचे अधिकारी खंडणी गोळा करतात. मला आणि ठाकरे परिवाराला ईडीच्या अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक बदनाम केले जात आहे.

ईडी ही मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांच्या वरती आहे का? ईडीच्या माध्यमातून फेडरल सिस्टीमची वाट लावली जात आहे. इतके दिवस देशाचा प्रश्न आहे म्हणून मी गप्प बसलो होतो. पण ही मुंबई आहे आणि मुंबईतील दादा हा शिवसैनिकच आहे. आता तुम्ही पाहाच काय होतं. मी लवकरच शिवसेना भवनात पत्रकारपरिषद घेणार आहे. त्यानंतरची पत्रकारपरिषद मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर घेईन, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com