दिनेश त्रिवेदी यांचा खासदारकीचा राजीनामा की, 9 वर्षांची सल?
लोकशाही न्यूज नेटवर्क
तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा सदस्य दिनेश त्रिवेदी यांनी सभागृहातच राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. आपला कोंडमारा होत असल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. पण नेमके हेच कारण होते की, गेल्या 9 वर्षांची सल कारणीभूत ठरली, अशी चर्चा रंगली आहे.
दिनेश त्रिवेदी यांच्या राजीनाम्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का मानला जातो. कारण तृणमूलचे दिग्गज नेते आणि ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक अशी त्यांची ओळख होती. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) दुसऱ्या कार्यकाळात दिनेश त्रिवेदी हे रेल्वेमंत्री होते.
त्यांनी 2012मध्ये रेल्वे अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावेळी त्यांनी 2 ते 30 पैसे प्रति किलोमीटर अशी भाडेवाढ प्रस्तावित केली होती. त्यांच्या आधी लालूप्रसाद यादव आणि ममता बॅनर्जी असताना भाडेवाढ करण्यात आली नव्हती. तथापि, तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी या अर्थसंकल्पावरून दिनेश त्रिवेदी यांची प्रशंसा केली होती. मात्र, या भाडेवाढीमुळे ममता बॅनर्जी या नाराज झाल्या आणि 24 तासांच्या आता त्यांनी त्रिवेदी यांचा राजीनामा घेऊन मुकुल रॉय यांना रेल्वेमंत्री बनवले.