पंतप्रधान मोदी राज्यसभेत काय म्हणाले?
लोकशाही न्यूज नेटवर्क
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत भाषण केलं. यावेळी त्यांनी अनेक मुदद्यांवर मत व्यक्त केलं आहे. कृषी कायदे, शेतकरी आंदोलन, कोरोना, अर्थव्यवस्था, शासकीय योजनांचं यश आदी विषयांवर पंतप्रधान मोदींनी मत व्यक्त केले. पंतप्रधान मोदींनी यावेळी विरोधकांवरही टीका केली. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींचे अभिभाषणाबाबत आभार मानले.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर अनेक विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. यावर पंतप्रधानांनी हल्लाबोल केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी सर्व उपस्थित असते तर बरं झालं असतं, असा टोला मोदींनी विरोधकांना लगावला.
संपूर्ण हिंदुस्थाननं कोरोना संकट थोपवलं –
कोरोना काळात मदत करणं कठीण होतं. कोरोना संकट अनपेक्षित होता, त्याचा कोणी विचारही केला नव्हता. मात्र, आपण त्यावर यशस्वी मात केली आहे. भारताचं यासाठी जगभरातून कौतुक होत आहे. कोरोना लढाई जिंकण्याचं यश सरकार किंवा व्यक्तिला नाही तर हिंदुस्थानला जातं. गर्व करण्यात काय जातं. आपल्या देशानं करून दाखवलं आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले. कोरोना वॉरियर्स, फ्रंटलाईन वर्कर्स कठीण काळात काम करत होते आणि करत आहेत. त्यांच्यामुळेच देशानं करून दाखवलं, असंही मोदी म्हणाले.
मानवजातीच्या कल्याणासाठी आपण लस घेऊन आलो. वैज्ञानिकांचं कौतुक करायला हवं, असेही ते म्हणाले. जगभरातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात सुरू आहे. केंद्र आणि राज्यांनी मिळून चांगलं काम केलं. राज्य सरकारचंही अभिनंदन करणं गरजेचं आहे. एकत्र येत काम करत कोरोना संकटाचं आपण संधीत रुपांतर केलं, असेही मोदी यावेळी म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी संपूर्ण भाषणादरम्यान सरकारनं केलेल्या कामगिरीचं कौतुक केलं. आतापर्यंतच्या सरकारी योजना, धोरणे याबाबत सरकारच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलं.
शेतकरी आंदोलनावर भाष्य –
कृषी सुधारणांवरून विरोधकांनी मोठा यू-टर्न घेतला आहे, असा आरोप पंतप्रधानांनी यावेळी केला. आंदोलनावरून सरकारला नक्की घेरा मात्र त्याचवेळी कृषी सुधारणा किती आवश्यक आहेत ते शेतकऱ्यांनाही समजून सांगा, असं आवाहन यावेळी मोदींनी विरोधकांना केलं.
शरद पवारांचा उल्लेख –
शरद पवार यांनी कृषी सुधारणांना पाठिंबा दर्शवला होता. काँग्रेसही कृषी सुधारणांच्या बाजूने होती. मात्र, आता अचानक यू-टर्न घेतला आहे. शरद पवारांनी नुकतंच एक वक्तव्य केलं होतं ज्यात ते कृषी सुधारणांना समर्थन असल्याचं म्हणताना दिसत आहेत, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.