निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे
महाराष्ट्रात विधानसभेचा निकाल लागला आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. महायुतीकडून सोमवारी शपथविधी समारंभ पार पडणार आहे. महायुतीकडून मुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. राज्यामध्ये महायुतीला २३० जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीला ५० चा आकडाही पार करता आला नाही. महाविकास आघाडीच्या मोठ्या पराभवानंतर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
थोडक्यात
'निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू'
'पराभूत झालो असलो तरी प्रांजळपणे काम करू'
सुप्रिया सुळे यांची निकालावर पहिली प्रतिक्रिया
काय म्हणाले सुप्रिया सुळे?
विधानसभा निवडणुकीत मायबाप जनतेने जो कौल दिला तो अतिशय नम्रपणे आम्ही स्वीकारत आहोत. या निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू आणि भविष्यातील सक्षम महाराष्ट्र उभा करण्यासाठी प्रामाणिकपणे लढत राहू. शेतकरी, कष्टकरी,महिला, तरुण व समाजातील प्रत्येक घटकांच्या हक्काची व स्वाभिमानाची लढाई आम्ही खंबीरपणे कायम लढत राहू. आता जरी आम्ही पराभूत झालो असलो तरी आपल्या मूल्यांसाठी प्रांजळपणे काम करत राहू आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची ही पालखी निष्ठेने, सर्व शक्तीनिशी पुढे नेऊ. या निवडणुकीत विजयी झालेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन. महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी आपण काम कराल ही अपेक्षा आहे. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेले मतदार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी, महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते व पदाधिकारी, निवडणूक आयोग,निवडणूक कर्मचारी, पोलीस कर्मचारी, प्रशासन, प्रसारमाध्यमे, सोशल मिडिया आदी सर्वांनी सक्रिय योगदान देऊन लोकशाहीचा हा उत्सव जागता ठेवून पार पाडला, याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद
पाहूयात सुप्रिया सुळेंचं ट्वीट