Shirur Sharad Pawar: वळसे पाटलांचा मंत्री पदापर्यंतचा प्रवास माझ्यामुळं पण ते... शरद पवार म्हणाले
शिरुरमध्ये सभे दरम्यान शरद पवारांनी दिलीप वळसे पाटील यांच्या संबंधित एक मोठ वक्तव्य केलं आहे. वळसे पाटलांचा मंत्री पदापर्यंतचा प्रवास माझ्यामुळे निर्माण झाला. तर पुढे शरद पवार म्हणाले की, आंबेगाव तालुक्याचं अन माझं एक अतूट नातं आहे. अगदी दिलीप वळसे पाटलांना इथून मी संधी देण्याआधी पासून माझं या तालुक्याशी संबंध येत गेला आहे. दिलीप वळसे पाटलांना मी संधी दिली, ते आमदार झाले याचा मला आनंद होता. पुढे मी त्यांना मंत्री देखील केलं तसेच विविध पदं देखील दिली. त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना संधी दिली. जे जे शक्य होतं, ते मी त्यांना दिलं. मात्र दिलीप वळसे पाटील गद्दार निघाले.
दिलीप वळसे हे गद्दार अन आता गद्दारांना सुट्टी नाही - शरद पवार
ज्यांना मी पद दिली, शक्ती दिली, अधिकार दिला, सन्मान दिला यांच्याकडून मला काही नको. आज लोक त्यांच्यावर नाराज आहेत. मंत्रिमंडळात ते गेल्यानं जनतेला हे आवडलेलं नाही. आज म्हणतात आमचे आणि पवार साहेबांचे संबंध अतिशय सलोख्याचे आहेत, असं अजिबात नाही. माझी पत्नी वर्षातून एकदा भीमाशंकरला जाते, आत्ता अलीकडे ही ती भीमाशंकरला आली. मी विचारलं नेहमी सारखी व्यवस्था होती का? त्या म्हणाल्या यावेळी दिलीप वळसेंच्या घरी गेलीच नाही, थेट भीमाशंकर दर्शन घेऊन परतले.
आता यांनी बोलायला काय ठेवलं आहे का? त्यांनी एकचं गोष्ट ठेवली, फक्त गद्दारी केली. ज्यांनी गद्दारी केली, त्यांना शिक्षा द्यायची असते. महाराजांसोबत ज्यांनी गद्दारी केली त्यांना कधी सोडलं का? त्यामुळं आपल्यासोबत गद्दारी केली, त्यांना सुट्टी नाही. या गद्दारांचा मोठ्या फरकाने पराभव करा आणि देवदत्त निकमांना आमदार बनवा.