Santosh Bangar
Santosh BangarTeam Lokshahi

संतोष बांगरांना "फोन-पे" प्रकरण भोवलं!

फोन पे करतो असं वक्तव्य केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कळमुरी पोलिसांत संतोष बांगरांवर गुन्हा दाखल...
Published by :
Team Lokshahi
Published on

केंद्रिय निवडणूक आयोगाने 15 तारखेला (गुरूवारी) पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेतून निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर करत आचारसंहिता लागू केली.

आचारसंहिता लागू झाल्यानंतर या काळात कोणत्याही प्रकारे पैशाच्या, जाती-धर्माच्या मुद्द्यावर प्रचार करण्यास मनाई असते. जर कोणत्या राजकीय व्यक्तीने आचारसंहितेचा भंग केला तर त्यावर कायदेशीर गुन्हा दाखल केला जातो. तसंच संबंधित उमेदवारावर निवडणूक आयोगाकडून निवडणूक लढवण्यास बंदी देखील घातली जाते.

अशातच शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी नेहमी प्रमाणे आपल्या स्वभावामुळे पुन्हा वाद ओढवून घेतलाय. कळमनुरी शहरातील एका आयोजित कार्यक्रमात संतोष बांगर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. मतदारांना आणण्यासाठी फोन पे वरून पैसे पाठवतो असं वक्तव्य संतोष बांगर यांनी केलं होतं. ही बातमी लोकशाही मराठीने लावून धरली होती. याप्रकरणी निवडणूक आयोगाकडून बांगर यांना नोटीसही बजावण्यात आली होती. या वक्तव्याप्रकरणी 24 तासात खुलासा जाहीर करावा असं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलेलं.

आमदार बांगर यांनी वक्तव्याचा खुलासा करण्यासाठी निवडणूक आयोगाला व्हिडीओ पाठवल्यानंतर आयोगाने व्हिडीओची तपासणी केली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेवरून गटविकास अधिकारी गणेश बोथीकर यांनी कळमनुरी पोलीस ठाण्यात बांगरांविरुद्ध तक्रार दाखल केली. त्या तक्रारीनुसार बांगरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com