कोल्हापूर उत्तरच्या राजकारणात ट्विस्ट: मधुरिमा राजे छत्रपती यांनी भरला उमेदवारी अर्ज
सतेज औंधकर|कोल्हापूर; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसने अवघ्या 48 तासात आपला उमेदवार बदलल्याने अनेक चर्चांना उत आलाय. काँग्रेसने कोल्हापूर उत्तर मतदारसंघात राजेश लाटकर यांच्या ऐवजी मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली आहे. कोल्हापुरात उमेदवार बदलण्याची काँग्रेसवर नामुष्की आल्यानं उत्तरच्या राजकारणात आता ट्विस्ट पाहायला मिळतोय.
आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने काँग्रेसने जोरदार शक्ती प्रदर्शन करत काँग्रेसच्या करवीर, दक्षिण आणि उत्तर या तीनही उमेदवारांचे अर्ज दाखल केलेत. मात्र राजेश लाटकर यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत काँग्रेसला थेट आव्हान दिले.
कोल्हापूर उत्तर मतदार संघाच्या जागेवरून सुरुवातीपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच होती. विद्यमान आमदार काँग्रेसच्या असल्याने सतेज पाटील यांनी उत्तरची जागा काँग्रेसला मिळवून दिली. पण उत्तर साठी नेमका उमेदवार कोण याची उत्सुकता राज्यभरात शिगेला पोचली होती. अखेर शनिवारी रात्री उशिरा दिल्लीतून काँग्रेसने राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर करत त्याचं प्रसिद्धीपत्रक ही जारी केलं. मात्र एकीकडे उमेदवारीची घोषणा होतात दुसरीकडे कोल्हापूरच्या काँग्रेस कमिटी कार्यालयात दगडफेकीचा प्रकार घडला तसेच हॅशटॅग चव्हाण पॅटर्न लिहीत राजेश लाटकर उमेदवार बदलाची मागणी केली. काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि उपमहापौरांनी आमदार सतेज पाटील यांना लेखी पत्र देत उमेदवार बदला असे स्पष्ट केलं. यानंतर अवघ्या 48 तासात कार्यकर्त्यांचा उद्रेक आणि नाट्यमय घडामोडीनंतर कोल्हापूर उत्तर मतदारसंघात राजेश लाटकर यांच्या ऐवजी मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. मधुरिमा राजे छत्रपती यांनी आज कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज जोरदार शक्ती प्रदर्शनाने दाखल केला. हा उमेदवार अर्ज दाखल करताना काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील, खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते.