Nashik Babanrao Gholap: नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला धक्का! बबनराव घोलप पुन्हा एकदा स्वगृही
विधानसभा निवडणुक तोंडावर येताच सर्व राजकीय पक्ष ॲक्शन मोडवर आलेली पाहायला मिळत आहे. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरु झाली आहे.
शिंदे गटाचे उपनेते माजी आमदार बबनराव घोलप यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले आहे. 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या उपस्थित हा पक्षप्रवेश करण्यात आलेला आहे. बबनराव घोलपांनी कालच शिंदेंच्या शिवसेनेला राजीनामा दिला होता.
तर बबनराव घोलप यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा देऊन शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र दोन दिवसांपूर्वी देवळाली विधानसभा मतदारसंघात बबनराव घोलप यांचे सुपुत्र योगेश घोलप यांना विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिल्यानंतर पुन्हा एकदा बबनराव घोलप यांनी सुद्धा स्वगृही प्रवेश केला आहे.